
‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा ठाणे महापालिकेत शुभारंभविद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळअधिक बळकट होईल – महापौर शर्मिला पिंपळोलकर
ठाणे, प्रतिनिधी: ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होण्यासाठी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय, प्लास्टिक संकलन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, गटअधिकारी संगीता बामणे बिसलेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अँजेलो जॉर्ज, बिसलेरीचे प्रतिनिधी राहूल पाटील यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.



