vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

 

क्लीव्हलँड, ओहायो प्रतिनिधी : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले.”

भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेली नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे.

प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पातून सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि 10,000 हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.एनएमआयएमसीची संकल्पना केवळ आरोग्य सेवा पुरविण्यापुरती मर्यादित नाही. या परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष, वेलनेस पायाभूत सुविधा आणि संबंधित आरोग्य सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार आहेत.

मेडिसिटीभोवती विकसित होणाऱ्या व्यापक नवोन्मेष परिसंस्थेचा भाग म्हणून, लक्ष्मी एन. मित्तल यांनी स्थापन केलेल्या एलएनएमआयआयटी, जयपूरने क्लीव्हलँड क्लिनिक आणि एनएमआयएमसीसोबत संशोधन पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान क्षमता आणि शैक्षणिक कौशल्य उपलब्ध करून अत्याधुनिक आरोग्य सेवा नवोन्मेष, ट्रान्सलेशनल रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रिसिजन मेडिसिन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. टॉम मिहाल्जेविक म्हणाले, “क्लीव्हलँड क्लिनिक जगभरातील धोरणात्मक भागीदारीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएमआयएमसी हा भविष्यातील रुग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि संशोधकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या दूरदर्शी आरोग्य परिसंस्थेत आमचे कौशल्य योगदान देण्याची संधी आहे. महाराष्ट्र शासन, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भारतात क्लिनिकल उत्कृष्टता, नवोन्मेष आणि शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभारण्यासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.”

ब्रुकफिल्डचे व्यवस्थापकीय भागीदार आणि आशिया पॅसिफिक विभागाचे रिअल इस्टेट प्रमुख अंकुर गुप्ता म्हणाले, “नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम घडवून आणणारी पायाभूत सुविधा उभारण्याची एक अद्वितीय संधी आहे. महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भविष्यातील अनेक पिढ्यांना लाभदायी ठरणारे जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा आम्हाला अभिमान आहे.”आरोधन हेल्थ सिटीच्या संस्थापक आणि संचालक डॉ. सलोनी पटवर्धन म्हणाल्या, “जगातील सर्वोत्तम संस्थांना एकत्र आणून एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजचा हा टप्पा आम्हाला त्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन गेला असून नवी मुंबईमध्ये जागतिक आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.”

महाराष्ट्र शासन या भागीदारीसाठी आवश्यक सहकार्य करेल तसेच लागू असलेल्या धोरणे आणि नियमांनुसार आवश्यक मंजुरी आणि परवानग्या मिळविण्यासाठी या समूहाला मदत करेल.

*नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विषयी*

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी हा महाराष्ट्र शासन विकसित करतअसलेला एक परिवर्तनकारी आरोग्य आणि जीवन विज्ञान उपक्रम आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक म्हणून विकसित होणारा हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत उभारला जाणार आहे. जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा प्रदाते, संशोधक, शिक्षक, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून क्लिनिकल उत्कृष्टता, संशोधन, नवोन्मेष आणि वैद्यकीय शिक्षणावर आधारित जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक आरोग्य सेवा केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

००००

संबंधित पोस्ट

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे शहर सर्वंकष गतीशीलता’ योजनेचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान लोक चळवळ व्हावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी*-पालकमंत्री शंभूराज देसाई*