vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई

नमुंमपा मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 2050 मि.मी. व्यासाच्या मुख्य भूमिगत जलवाहिनीवर पनवेल तालुक्यातील देवद व विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत काही व्यक्तींमार्फत अनधिकृत नळजोडणी करून पाण्याचा वापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

          त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता मुख्य जलवाहिनीवर सुमारे 100 मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी एप्रिल 2025 मध्ये सदर अनधिकृत नळजोडणी महानगरपालिकेमार्फत त्वरित खंडित करण्यात आली होती. तसेच विचुंबे व देवद ग्रामपंचायतींना अनधिकृत नळजोडणीद्वारे वापरलेल्या पाण्यापोटी दंडात्मक स्वरूपाची रु. 80,92,560/- इतकी रक्कम भरण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती.

          त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये मुख्य जलवाहिनीवरील ब्रेकडाऊन दुरुस्तीच्या वेळी त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे आढळून आले. सदर जोडणी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई हाती घेतली असता काही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्या वेळी सदर जोडणी खंडित करणे शक्य झाले नाही. तसेच देवद व विचुंबे ग्रामपंचायतींना सदर अनधिकृत जोडणी त्वरित काढून टाकण्याबाबत व दंडात्मक रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. तथापि, त्यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली नाही.

          त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिनांक 28 मार्च 2026 रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस बंदोबस्तात संबंधित अनधिकृत नळजोडणी खंडित करण्यात आली.

          यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या पुढील तपासणीत याच ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर पुन्हा छेडछाड करून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले. अनधिकृतरित्या वापरलेल्या पाण्याबाबत दंडात्मक स्वरूपाची रु. 1,17,61,239/- इतकी रक्कम भरणा करण्याबाबत जिल्हा परिषद, रायगड यांना कळविण्यात आले व सदर अनधिकृत जोडणी त्वरित खंडीत करण्यासाठी कळविण्यात आले.

          मुख्य जलवाहिनीशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे, अनधिकृत नळजोडणी करणे अथवा पाण्याची चोरी करणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन नागरिकांच्या पाणीपुरवठा सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

          सदर प्रकार तिसऱ्यांदा निदर्शनास आल्याने प्राप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 326(अ), 125, 324, 3(5) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, 1984 मधील कलम 3(2)(c) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

          तसेच दि. 19 जून 2026 रोजी, रात्री ११.३० ते दि २० जून २०२६ रोजी सकाळी ८.०० पर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलिस स्टेशन यांचे वतीने उपलब्ध मोठ्या प्रमाणातील पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत नळजोडणी निष्कासित करण्यात आली व आवश्यक उपाययोजना करण्यात आली. या ठिकाणी निगराणीकरिता सीसीटिव्ही बसविण्यात आले असून जलवाहिनीशी पुन्हा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस विभागाकडून संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

00000

संबंधित पोस्ट

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायबर फसवणूक तक्रारीसाठी ‘गोल्डन अवर’ महत्वाचा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन, वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन