
इन्फ्लूएन्झाबाबत भीती नको, सतर्कता बाळगा आणि योग्य काळजी घ्या – नागरिकांना आवाहन
आरोग्य प्रतिनिधी –
राज्यात इन्फ्लूएन्झाचा आजार साधारणत: जानेवारी ते मार्च तसेच पावसाळा व त्यानंतर माहे ऑगस्ट व ऑक्टोबर या महिन्यामध्ये आढळून येतो. मात्र याबाबत लवकर निदान व वेळीच उपचार केल्याने तो पूर्णपणे बरा होतो.
याची लक्षणे फ्लू सदृश्य असून – (1) ताप, (2) घसादुखी अथवा घशाला खवखव, (3) खोकला व नाक गळणे, (4) अंगदुखी, (5) डोकेदुखी किंवा (6) इतर कोणतेही निदान झालेले नसणे.
यामध्ये अति जोखमीच्या गटात – बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा किंवा किडनीचे विकार असलेले रुग्ण येतात. अशा व्यक्तींमध्ये हा आजार काही वेळेला गंभीर स्वरूप धारण करू शकतो, त्यामुळे लक्षणे जाणवल्यास लगेच तपासणी व उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
संक्रमण कालावधी – इन्फ्लूएन्झाचा अधिशयन कालावधी हा 1 ते 7 दिवसांचा आहे. इन्फ्लूएन्झा रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्यानंतर पुढील ७ दिवसापर्यन्त इन्फ्ल्युएन्झाचा रुग्ण निकट सहवासितांमध्ये संसर्ग संक्रमित करू शकतो. त्यामुळे या कालावधीत इन्फ्लून्झा बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या निकट सहवासितांनाही औषध उपचार करणे आवश्यक आहे.
इन्फ्लूएन्झा निदान – सौम्य लक्षणे आढळलेल्या रुग्णाचा स्वॅब घेण्याची आवश्यकता नाही. मात्र फ्लू सर्वेक्षणातून जे रुग्ण आढळतील त्यातील फ्लू रुग्णांच्या वर्गवारीनुसार सौम्य स्वरूपाच्या फ्लू रुग्णांना लक्षणांनुसार उपचार देण्यात येतात. मध्यम आणि गंभीर स्वरूपाचे रुग्ण जसे की सौम्य लक्षणांसोबत तीव्र घसादुखी, घशाला सूज किंवा जास्त ताप ही लक्षणे आढळल्यास रुग्णाचा नाक किवा घशातील स्त्रावाचा स्वॅब तपासणी साठी घेण्यात येतो व त्याची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येते व आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळा तपासण्यांचे अहवालच वैध धरण्यात येतात. सदर तपासणीमध्ये स्वाइन फ्लू बाधित रुग्ण आढळल्यास बाधित रुग्णाच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन, त्यांपैकी फ्लू सदृश लक्षणे असणाऱ्या निकट सहवासितांचे त्वरित अलगीकरण करून खालील प्रमाणे उपचार देण्यात येतात.
इन्फ्लूएन्झा उपचार – सौम्य लक्षणे आढळलेल्या रुग्णांना लक्षणानुसार उपचार देण्यात येतो, स्वॅब घेतल्यानंतर रुग्णांना टॅमिफ्लू औषधे सुरू करण्यात येते, आयसीएमआर. लॅबच्या तपासणी अहवालानुसार फ्लू निदान झालेल्या रुग्णाच्या निकटवासीयांना प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात येतात.
काय करावे –
o वारंवार साबणाने स्वच्छ हात धुवा,
o पौष्टिक आहार घ्या, लिंबू, आवळा, संत्री यांसारख्या व्हिटॅमिन-सी युक्त फळांचा आहारात वापर करा,
o भरपूर पाणी प्या.
o शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरा.
o पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
काय टाळावे –
o फ्ल्यू सदृश लक्षणे असताना गर्दीच्या ठिकाणी किंवा घराबाहेर जाणे टाळा.
o हस्तांदोलन करणे टाळा.
o धूम्रपान टाळा.
o सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा.
o सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका.
मास्कचा वापर – सर्वसामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. चुकीच्या पध्दतीने दीर्घकाळ मास्क वापरल्याने तसेच मास्कची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावल्याने संसर्ग वाढण्याची भीती असते त्यामुळे सर्वसामान्य जनतेने घडीचा रुमाल वापरणे अधिक योग्य आहे.
पावसाळा आणि त्यानंतरच्या महिन्यांत वाढणारा इन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिका क्षेत्रात सर्व स्तरावर सर्वेक्षण करण्यात येत आहे. रुग्णांचे वेळेवर निदान करून त्यांना योग्य उपचार देणे हे महानगरपालिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये इन्फ्लूएन्झा संशयित रुग्णांच्या नमुने संकलनाची आणि उपचारांची पुरेशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णालयांमध्ये विशेष विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात आले असून आवश्यक औषधसाठा व इतर साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगून योग्य काळजी घ्यावी आणि फ्लू सदृश्य लक्षणे दिसताच नवी मुंबई महानगरपालिकेची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व महापालिका रूग्णालयांतून उपचार घ्यावेत असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
000000



