vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

महिलांच्या कलागुणांसाठी पारंपारिक मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

महिलांच्या कलागुणांसाठी पारंपारिक मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांकरिता महिला मेळाव्याचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने महिलांकरिता मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जे महिला समुह सहभाग घेऊ इच्छितात त्यांनी आपले अर्ज दि. 15 ऑगस्ट 2026 पर्यत आपल्या कार्यक्षेत्रातील विभाग कार्यालय तसेच उपआयुक्त, समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी. बेलापूर येथे कार्यालयीन सुट्टी वगळता जमा करावेत असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

          या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी, सकाळी 9 वाजल्यापासून महात्मा फुले स्मृती भवन, भूखंड क्र.12/13, तिसरा मजला, सेक्टर -3, वाशी नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. याविषयीची माहिती अर्ज दाखल करणा-या स्पर्धकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. या व्यतिरीक्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला गटांकरिता गटांच्या माध्यमातून सक्षक्तीकरण या विषयाबाबत तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

          ही मंगळागौर स्पर्धा फक्त महिलांसाठी खुली राहील. प्रत्येक संघामध्ये किमान 10 आणि कमाल 15 महिला सदस्य सहभागी असाव्यात. एका महिलेला एकाच समुहातूनच सहभागी होता येईल. तसेच स्पर्धेकरिता महिलांनी अंतिम तारखेपूर्वी सहभाग नोंदणी करणे आवश्यक आहे.

          स्पर्धेमध्ये मंगळागौर सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी 8 मिनीटे ते जास्तीत जास्त 10 मिनिटे असेल. महिला समुहाने वेळेची मर्यादा ओलांडल्यास गुण वजा केले जातील याची नोंद घ्यावयाची आहे. महिला समुहाने सादरीकरणामध्ये मंगळागौरीची पारंपारिक संस्कृती, लोकनृत्य व पारंपारिक खेळांचे दर्शन होणे अपेक्षित आहे. जो संघ सादरीकरणामध्ये झिम्मा, फुगडी, गोफ, टिपऱ्या इत्यादी पारंपरिक घटकांचा योग्य वापर करेल त्या संघाला प्राधान्य दिले जाईल. मंगळागौर सादरीकरणामध्ये पारंपरिकता आणि नाविन्य यांचा सुंदर समतोल असावा.

          मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण करताना पारंपारिकता व संस्कृतीचे सादरीकरण, नृत्य कौशल्य व तालबद्धता, झिम्मा / फुगडी / गोफ इत्यादींची अचूकता, सर्जनशीलता व नृत्यरचना, अभिनय व भावभावना, वेशभूषा व एकसंधता, संघातील समन्वय तसेच मंचावरील वावर आणि एकूण सादरीकरण अशा घटकांचा गुणांकनात विचार करण्यात येईल.

          मंगळागौरीकरिता संगीत / ट्रॅक स्पर्धकांनी स्वतः उपलब्ध करुन घ्यावयाचा आहे. संगीताची ऑडिओ फाईल स्पर्धेपूर्वी आयोजकांकडे जमा करणे आवश्यक आहे. संगीतामध्ये अश्लील, आक्षेपार्ह किंवा सांस्कृतिक मूल्यांना बाधा आणणारे शब्द/दृश्य नसावेत.

          स्पर्धक समुहाची वेशभूषा महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची असणे अपेक्षित आहे. समुहास नऊवारी / पारंपारिक साडी, नथ, गजरा, पारंपरिक दागिने यांचा योग्य वापर करता येईल. स्पर्धक समुहाची वेशभूषा सादरीकरणाच्या विषयाला अनुरूप आणि सुसंस्कृत असावी.

          स्पर्धक समुहाला आवश्यकता असल्यास पारंपारिक साहित्याचा वापर करता येईल. वापरण्यात येणारे साहित्य सुरक्षित व स्टेजसाठी योग्य असावे. ज्यामुळे स्टेजला नुकसान होईल किंवा इतर स्पर्धकांना धोका निर्माण होईल असे साहित्य वापरण्यास परवानगी नसेल.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी मंगळागौर यासारख्या पारंपारिक प्रकारातील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये महिला मंडळे, संस्था, समुह, गट यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता सुरज पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.00000

संबंधित पोस्ट

आगासन गाव येथे अखंड हरिनाम सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात सम्पन्न-ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांच्या कालाच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता

vishwatmaklokswamivarta

आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.

vishwatmaklokswamivarta

गुरुचरित्र ग्रंथाची ताकद….

vishwatmaklokswamivarta

आत्मनिरीक्षणाचा दिव्य संद पसरवत ७८ वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न झाला.मुंबई आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी सहभाग घेतला.आत्मसुधारणेद्वारे जगात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण करा-निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

vishwatmaklokswamivarta

गणपती अथर्वशीर्षाचे महत्व, फायदे आणि नियम

vishwatmaklokswamivarta

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या ९ रूपांचीही पूजा,देवीची नऊ प्रकारचे विशेष नैवेद्य ..

vishwatmaklokswamivarta