
सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मोफत मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण,जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; रस्ता सुरक्षेसह रोजगाराच्या संधींना चालना देण्याचा प्रयत्न.
जालना, प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारी कमी करण्याबरोबरच रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी युवकांना मोटर व्यावसायिक ड्रायव्हर प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT), पुणे आणि इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), पुणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना हलके मोटार वाहन (LMV) तसेच जड मोटार वाहन (HMV) चालविण्याचे शास्त्रोक्त, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे युवकांना वाहनचालक क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परिवहन क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना केवळ वाहन चालविण्याचे प्रशिक्षण न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, वाहनांची तांत्रिक माहिती आणि सुरक्षित वाहनचालक म्हणून आवश्यक असलेल्या विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये VR Simulator, हायवे ड्रायव्हिंग तंत्र, ट्रॅफिक साईनबोर्डची माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यांचा समावेश असणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या कालावधीत निवासाची तसेच भोजनाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोजचा अल्पाहार व जेवणाची सुविधा देण्यात येणार असून, निवासी प्रशिक्षणामुळे युवकांना प्रशिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार चष्म्याचे वाटपही केले जाणार आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमोपचार व आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक कौशल्ये, वाहनांची देखभाल, सुरक्षित ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
LMV आणि HMV प्रशिक्षण
उपलब्ध माहितीनुसार, LMV प्रशिक्षणाचा कालावधी सुमारे ३० दिवस, तर HMV प्रशिक्षणाचा कालावधी साधारण ३० ते 45 दिवस आहे. HMV प्रशिक्षणासाठी ‘SARATHI Project’ आणि LMV प्रशिक्षणासाठी ‘PARWAZ Project’ अंतर्गत प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना व्यावसायिक वाहनचालक म्हणून रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.
या प्रशिक्षणामुळे युवकांना वाहनचालक क्षेत्रातील आवश्यक व्यावसायिक कौशल्ये प्राप्त होतील. परिणामी परिवहन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
या प्रशिक्षण उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), जालना येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी केले आहे. प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR), फुरसुंगी, पुणे येथे होणार आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, CIRT पुणे व IDTR पुणे यांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. अधिक माहितीसाठी idtrpune@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल. जालना येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या माध्यमातूनही इच्छुक युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
-*-*-*-*-*-



