मुंबईत मुंबई महानगरपालिकेचा श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६ चा निकाल जाहीर
मुंबई प्रतिनिधी-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६’चा निकाल मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केला.
🔷यावेळी उपमहापौर श्री. संजय घाडी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते.🔷या स्पर्धेत अंधेरी (पश्चिम) येथील ‘स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव’ या मंडळाला प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) घोषित करण्यात आला.🔷घाटकोपर (पश्चिम) येथील ‘अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ’ (भटवाडीचा राजा) या मंडळाची द्वितीय पुरस्कारासाठी (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह), तर करीरोड येथील ‘पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळा’ची तृतीय पुरस्कारासाठी (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) निवड करण्यात आली. 🔷यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार (रुपये २५,००० आणि सन्मानचिन्ह) कांजूरमार्ग येथील ‘शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’स जाहीर झाला. 🔷तसेच, सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचा पुरस्कार (रुपये २५,००० आणि सन्मानचिन्ह) विलेपार्ले येथील बाळ गोपाळ मित्रमंडळाच्या ‘मुंबईचा पेशवा’ या मूर्तीसाठी श्री. मयेकर यांना, तर सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचा (सजावटकाराचे) पुरस्कार (रुपये २०,००० आणि सन्मानचिन्ह) बोरिवली (पूर्व) येथील विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळाच्या (‘चंपाभुवनचा विघ्नहर्ता’) सजावटीसाठी श्रीमती रेश्मा शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
🔷अवयवदान जागृतीसाठी (रुपये १५,००० आणि सन्मानचिन्ह) विक्रोळी (पश्चिम) येथील ‘बालमित्र कला मंडळ’, तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी (प्रत्येकी रुपये १०,००० आणि सन्मानचिन्ह) कोकणीपाडा, दहिसर (पूर्व) येथील ‘श्री श्रद्धा मित्र मंडळ’ आणि दादर (पश्चिम) येथील ‘शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
🔷गोरेगाव (पश्चिम) येथील ‘बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळ’ आणि मालवणी, मालाड येथील ‘युवक उत्कर्ष मंडळ’ यांना उत्तेजनार्थ (प्रत्येकी रुपये १०,००० आणि सन्मानचिन्ह) पुरस्कार घोषित करण्यात आला.
🔷याव्यतिरिक्त १४ मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत.