सेवा संकल्प अभियान’; नांदुरा तालुक्यात ‘एफएलसीसी व सहव्याधित कुष्ठरोग सर्वेक्षण’ मोहीम सुरू
बुलढाणा, प्रतिनिधी : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नांदुरा तालुक्यात आरोग्य विभागामार्फत ‘एफएलसीसी व सहव्याधित कुष्ठरोग सर्वेक्षण’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे
या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागातील प्रशिक्षित कर्मचारी, एएनएम, एमपीडब्ल्यू व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडक गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात येत आहे. संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणे, त्यांची तपासणी व निदान करून त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, तसेच कुष्ठरोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नांदुरा येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून, त्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क उपचार उपलब्ध आहेत. शरीरावर फिकट लालसर किंवा पांढरट, बधिर चट्टा अथवा गाठ आढळल्यास नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचार केल्यास आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते
नागरिकांनी आरोग्य पथकांना सहकार्य करून संशयित रुग्णांची माहिती द्यावी व नांदुरा तालुका कुष्ठरोगमुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय रिंधे यांनी केले आहे.