
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती
अमरावती, प्रतिनिधी: जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्ताने सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
4 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या औचित्याने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम साजरा झाला.
यावेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने व डॉ. स्वाती सोनोने यांनी उपस्थित रुग्णांना मानसिक आजारांची लक्षणे, उपचार व मानसिक आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेश्राम यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आजारांविषयी सविस्तर माहिती देत, मानसिक आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. मानसिक आरोग्याबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करून मानसिक आजारांवरील उपचाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेश्राम, डॉ. अक्षय चांदूरकर, डॉ. अमर बोडले, डॉ. ऋषिकेश, डॉ. रचना, डॉ. दीपक ठाकरे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व मानसिक आरोग्य विभागातील प्रशिक्षु वैद्यक (इंटर्न) उपस्थित होते.
0000000



