
करिअर समुपदेशन सत्रातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची ओळख
सांगली, द प्रतिनिधी) : भविष्यातील करिअरची दिशा योग्य वेळी निश्चित करण्याच्या दृष्टीने तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील श्री लक्ष्य अकॅडमी सैनिक पॅटर्न स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मणेराजुरी, येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या सत्रामध्ये श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे यंग प्रोफेशनल प्रविण बनकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या वाटा, कौशल्याधारित क्षेत्रांतील संधी आणि रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाबाबत माहिती दिली.
विशेषतः केवळ पारंपरिक शैक्षणिक पर्यायांपुरते मर्यादित न राहता कौशल्य, व्यक्तिमत्त्व, आवड आणि क्षमतेनुसार करिअरची निवड कशी करावी, यावर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व पूर्वतयारी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी करिअर निवड, रोजगाराच्या संधी आणि पुढील शिक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील करिअरचे नियोजन करण्यासाठी आवश्यक दिशा व प्राथमिक माहिती मिळाली. यावेळी अकॅडमी चे अध्यक्ष श्री. गुरव व अन्य मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
00000



