गुन्हे प्रतिनिधी-मुंबईजवळील नालासोपारा परिसरात एका अत्यंत संतापजनक आणि गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. सुरुवातीला केवळ एका आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेल्या या प्रकरणाने आता अतिशय भयानक वळण घेतले असून, यात महिलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ परदेशातील साईट्सवर विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरिफ अय्युब शेख या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
घटनेची सुरुवात ९ ऑक्टोबर रोजी झाली. नालासोपारा पश्चिम भागातील छेडानगर येथे असलेल्या वेबकॉर्न जिममध्ये काही तरुण व्यायाम करत होते. यावेळी आरोपी आरिफ अय्युब शेख याने नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या हिंदू महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक टिप्पणी केली होती. या धक्कादायक प्रकारानंतर जेव्हा त्याचा मोबाईल तपासण्यात आला, तेव्हा त्यामध्ये सुरुवातीला तीसहून अधिक अश्लील व्हिडिओ असल्याचे आढळून आले होते. मात्र, जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे गेला, तसतशी ही संख्या दीडशेच्या घरात पोहोचल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणात १२ ऑक्टोबर रोजी एका पीडित तरुणीने पुढे येत नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात थेट लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.विश्व हिंदू महासंघ मुंबईचे प्रभारी प्रदीप मिश्रा यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही काही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत वाट पाहावी लागली. तसेच, पहाटे तीनच्या सुमारास अहमद मेमन नावाची एक व्यक्ती तिथे आली आणि ती आरोपीला घेऊन गेली, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, पोलिसांकडे पुराव्यासाठी दिलेला आरोपीचा मोबाईल नंतर छेडछाडीचा बळी ठरल्याचा आरोप प्रदीप मिश्रा यांनी केला आहे. मोबाईलमधील अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे डिलीट करण्यात आले असून, हे कसे घडले याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोपीने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि हे कथित व्हिडिओ परदेशातील अश्लील संकेतस्थळांवर विकून आर्थिक फायदा मिळवला, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर कॅमेऱ्यासमोर कोणतीही अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. या प्रकरणातील सत्यता तपासण्यासाठी डिजिटल पुराव्यांची आणि यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची कसून चौकशी होणे गरजेचे बनले आहे.
याबाबत अनेक महिलांनी अशा आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे जेणेकरून समाजात कोणी असे कृत्य करणार नाही परंतु प्रशासन कठोर कारवाई करत नसल्याने आरोपींना सजा शिक्षा होत नाही वेळेवरच त्यांना ठेचले तर असे प्रकार समाजात कधीच घडणार नाही प्रशासनाने यावर कठोर कारवाई करून अशा दोषी लोकांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी सध्या विभागातून सुरू आहे सदर प्रकरणी पोलीस तपास करत असून आरोपीला वाचवण्यासाठी काही लोक काम करत असल्याची माहिती ची चर्चा आहे