अवयवदानाचा सांगली पॅटर्न तयार करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ची भावना नागरिकांत रूजविण्याचे आवाहन- अवयवदानासाठी क्यू आर कोड सुविधेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण…
अवयवदानाचा सांगली पॅटर्न तयार करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ची भावना नागरिकांत रूजविण्याचे आवाहन- अवयवदानासाठी क्यू आर कोड सुविधेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण…
सांगली, प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीतील दातृत्वाची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. मृत्यूपश्चात पुण्य कमवायचे असेल तर अवयवदानासारखी दुसरी संधी नाही. मरावे परी अवयवरूपी उरावे, या उक्तीप्रमाणे दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून कोणताही नागरिक मृत्युनंतरही जिवंत राहू शकतो. त्यामुळे अवयवदान चळवळीचा सांगली पॅटर्न तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
राज्य शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये अवयवदानाची ऐच्छिक चळवळ आगामी चार महिन्यात राबवण्यात येत आहे. अवयवदानासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून तो मोबाईलवर स्कॅन करून प्राप्त अर्जात माहिती भरल्यास अवयवदानाची नोंद होणार आहे. या क्यू आर कोडचे जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, सांगली व तहसील कार्यालय, मिरज येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष अनावरण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात श्री. काकडे यांनी नागरिकांनी अवयवदान करण्याचे आवाहन केले.तिन्ही कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. हेमा चौधरी, तहसीलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, तहसिलदार लीना खरात, तहसिलदार अमोल कुंभार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, तहसीलदार अश्विनी वरूटे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत इंगवले, विशाल घनवट आणि अमित गुरव, तहसील कार्यालय, मिरज येथे आयोजित कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पोलीस निरीक्षक मिरज शहर श्री. रासकर, तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, दुय्यम निबंधक श्रीमती सातपुते यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना लोकाभिमुख उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अवयवदानाचे महत्त्व कुटुंबालाही समजून सांगावे. केवळ नोंद करून थांबू नका, तर यासाठी जनजागृती करण्यात कृतीशीलता आणा. नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व सांगून त्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवावा. दृढनिष्ठेने ही चळवळ पुढे न्यावी, असे ते म्हणाले.अवयवदान ही परमेश्वराने आपल्याला मृत्यूनंतरही जीवंत ठेवण्याची शास्त्राने विकसीत केलेली पध्दत आहे. अवयवदानातून एका गरजू व्यक्तीला जीवनदान मिळाले तर ते फार मोठे पुण्य आहे. ज्याच्याकडे नाही, त्याला देणे यामध्ये मनाचा एक फार मोठा भाव आहे. दानाचे पुण्य तेंव्हाच मिळते जेंव्हा ते कोणाला केले हे कळत नाही. अवयवदानाच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. याची माहिती आपल्या घरातील व्यक्तीनांही द्यावी, असे ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी क्यूआरकोडचा वापर करून अवयवदानासाठी ऑनलाईन प्रतिज्ञापत्र सादर करून एक चांगला उपक्रम सुरू केल्याचे सांगून डॉ. हेमा चौधरी म्हणाल्या, मृत्यू ही प्रत्येकाच्या जीवनात येणारी दुर्देवी घटना असून ती अटळ आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून जाता जाता दिले जाणारे दान हे गरजू लोकांना उपयोगी पडणार आहे. त्याला जीवनदान मिळणार आहे. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत अवयवदान करावे लागते. यामध्ये मृत व्यक्तिच्या शरीराला कोणतीही विद्रुपता येत नाही. ब्रेन डेड (मेंदू मृत अवस्थेत) व्यक्तीचे अवयवदान करू शकतो. यासाठी चांगली भावना मनात ठेऊन अवयवदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अवयवदानासाठीचे प्रतिज्ञापत्र क्यूआरकोडव्दारे ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करून अवयवदान चळवळीची सुरूवात स्वत:पासून केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अवयवदानासाठी क्यूआरकोड स्वत:च्या मोबाईलवर स्कॅन करून रजिस्ट्रेशन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते अवयवदानाची नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
उपक्रमाच्या पहिल्या दिवशी अवयवदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 30 अर्ज, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 अर्जांची नोंदणी झाली.