जागतिक सिकलसेल दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “सिकलसेल जनजागृती पंधरवडा”दि. १५ ते ३० जून २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे प्रतिनिधी जिल्हा परिषद, ठाणे) – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सिकलसेल अॅनेमिया निर्मूलन मिशन अंतर्गत सन २०४७ पर्यंत सिकलसेल रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, दरवर्षी दि. १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिन साजरा केला जातो. यावर्षीही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विभागाशी समन्वय साधून आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे मार्फत दि. १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत “सिकलसेल जनजागृती पंधरवडा” राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
ही मोहीम जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये, प्रा.आ. केंद्रे व उपकेंद्रांमध्ये प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.
सिकलसेल आजार – अनुवंशिक रक्तदोष सिकलसेल हा आजार अनुवंशिक रक्तदोष असून यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार विळ्याच्या (Sickle) आकाराचा होतो. त्यामुळे पेशींची लवचिकता कमी होऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. परिणामी सांधे दुखणे, थकवा, हिमोग्लोबिनची कमतरता, शरीर पिवळसर होणे, वारंवार संसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसले तरी प्रतिबंधात्मक उपाय व योग्य काळजी घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते.
जनजागृती पंधरवड्यातील उपक्रम :सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिरे आयोजित.लोकांमध्ये समुपदेशन व सिकलसेल बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत माहिती.वय १२ ते १७ वर्षांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सिकलसेल आजार, त्याचे संभाव्य धोके व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन.तपासणीसाठी रक्तनमुना घेऊन मोफत निदान उपलब्ध.वाहक व ग्रस्त रुग्णांना मोफत समुपदेशन, औषधोपचार व संदर्भ सेवा.
सिकलसेल प्रतिबंधासाठी विवाहपूर्व तपासणीचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, सिकलसेल आजाराचा प्रसार पुढील पिढीत होऊ नये यासाठी लग्न ठरण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांनीही रक्ताची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
असे विवाह टाळावेत :1. दोघेही सिकलसेलचे वाहक असतील तर.2. एक वाहक आणि एक ग्रस्त असल्यास.3. दोघेही ग्रस्त असतील तर, कारण त्यांच्या अपत्यात सिकलसेल आजाराची शक्यता अत्यंत जास्त असते.
जनतेसाठी महत्त्वाचे संदेश :सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो.सिकलसेल वाहक व्यक्ती सामान्यतः निरोगी दिसते, परंतु पुढच्या पिढीत आजार देण्याची शक्यता असते.रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे, अशक्तपणा, वेदना, संसर्ग होणे ही सिकलसेलची प्रमुख लक्षणे आहेत.शासकीय रुग्णालयांमध्ये सिकलसेल तपासणी, औषधोपचार व सल्ला मोफत उपलब्ध आहे.समाजाने पुढाकार घेत विवाहपूर्व तपासणी, शालेय पातळीवर जनजागृती, व योग्य उपचार यामार्फत रोगनिर्मूलन शक्य आहे.
आरोग्य विभाग ठाणे यांचे जनतेस आवाहन :सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृती वाढवून हा आजार पुढील पिढीत जाऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने रक्त तपासणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने करण्यात येत आहे