vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल – जिल्हाधिकारी अशोक काकडे  मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता.- राज्यातील पहिला उपक्रम

कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल – जिल्हाधिकारी अशोक काकडे

 मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता.- राज्यातील पहिला उपक्रम

 सांगली, प्रतिनिधी) : कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून मूकबधीर विद्यार्थी स्वावलंबी होतील. त्यांना रोजगार – स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल करणारा हा उपक्रम आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्यात सांगली जिल्ह्यातील उर्वरित 12 मूकबधीर शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवला जाईल. याचबरोबर एमकेसीएलच्या मदतीने दिव्यांगांना एमएससीआयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.

 सांगली जिल्ह्यातील व राज्यातील पहिल्या अशा मूकबधीर विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. रा. हि. भिडे मूकबधीर शाळा, मिरज येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी भारत निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, वुई फाऊंडेशनचे दिनेश कदम, एमकेसीएल परिमल पाटील, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रध्दा जोशी आदि उपस्थित होते.

 

 “आमची सांगली – सक्षम दिव्यांग आमचा अभिमान” ही संकल्पना घेऊन हा उपक्रम राबवला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी आहे, त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे. हे लक्षात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर कै. रा. हि. भिडे मूकबधीर शाळा, मिरज येथील पाचवी ते आठवीच्या 73 विद्यार्थ्यांना 21 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत दररोज तीन तास हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत असलेला आत्मविश्वास पाहून आपण हेलावून गेलो असल्याचे ते म्हणाले.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, असे उपक्रम शिकता शिकता कमवा योजनेत रूपांतरीत करू. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात भरवण्यासाठी प्रयत्न करू. नागरिकांनीही कोणताही मोलभाव न करता दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तु खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  आजचा दिवस आनंदाचा आणि दीर्घकाल स्मरणात राहील असा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यासाठी वुई फाऊंडेशनने घेतलेला पुढाकार व भिडे मूकबधीर शाळेने शालेय शिक्षणाबरोबर हा उपक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन करून ऋणनिर्देश व्यक्त केले. तसेच, जिथे राबती हात तेथे हरी या काव्यपंक्तीप्रमाणे दिव्यांगांच्या हातात पांडुरंग उतरो आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडो, अशा शुभेच्छाही दिल्या.

जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी भारत निकम म्हणाले, राज्य शासनाचा दिव्यांग सक्षमीकरणावर भर असून, सामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांप्रमाणेच दिव्यांगाचाही उत्कर्ष व्हावा, यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. हे प्रशिक्षण हे त्यापैकीच एक असून, भविष्यात दिव्यांगासाठी रोजगार – स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा पहिला उपक्रम ठरेल. हा सांगली पॅटर्न सर्व सांगलीकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनेश कदम यांनी दिव्यांगांसाठी अशा प्रशिक्षणासाठी जिल्हा प्रशासन व भिडे मूकबधीर शाळेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्यासारखा असल्याचे सांगितले. पालक पौर्णिमा माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

 निरंजन आवटी यांनी प्रास्ताविकात हा उपक्रम राबवण्याची संधी भिडे मूकबधीर शाळेला दिल्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आभार शशिप्रिया पंडीत यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. जोशी यांनी केले. यावेळी भिडे मूकबधीर शाळेचे उपमुख्याध्यापक दिनेश गडवीर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, जिल्ह्यातील सर्व मूकबधीर शाळांचे मुख्याध्यापक, वुई फाऊंडेशनचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शन संदीप गवळी यांनी विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेत रूपांतरीत केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले. तसेच, उपस्थितांना कवायतीची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच, विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातील सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्या या प्रगतीबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आत्मियतेने सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले.

00000

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

ओरिसा च्या समुद्रकिनारी : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण….

राजस्थानमधील बुंदी येथीलसंतापजनक घटना तीन नराधमांनी  मृत्यूनंतरही अल्पवयीन मुली  वर तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

शिवाजी पार्कवरच होणार दसरा मेळावा’; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

आज 23 ऑगस्ट भारतात चांद्रयान-3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय अंतराळ दिन” साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची पध्दत आहे. पण विरोधकांकडून मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार , विरोधी पक्ष नेते अजित पवार

vishwatmaklokswamivarta