vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचा अनोखा पुढाकारआश्रमशाळेतील ‘पिंक रूम’ ठरतेय आदिवासी कन्यांच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची हक्काची जागा..!

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचा अनोखा पुढाकारआश्रमशाळेतील ‘पिंक रूम’ ठरतेय आदिवासी कन्यांच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची हक्काची जागा..!

   विशेष प्रतिनिधी-   आयुष्य जगत असताना केवळ स्वप्न बघून किंवा इच्छा बाळगून चालत नाही तर ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी ते ध्येय पूर्ण होण्याचा ध्यास बाळगून अहोरात्र मेहनत करणेही आवश्यक असते. प्रशासकीय सेवेमध्ये असे केल्यास केलेल्या कामाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंचे आशिर्वादही मिळतात.    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत १५ जून २०२६ रोजी एक अत्यंत कौतुकास्पद आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. निमित्त होते शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या भव्य ‘शाळा प्रवेशोत्सवाचे’.

     एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण (जि. रायगड) यांच्या वतीने आयोजित हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांचे स्वागत करणारा ठरला नाही, तर आदिवासी मुलींच्या आरोग्य आणि संवेदनशील गरजांना एक नवी दिशा देणारा ठरला.

       या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाच्या या उपक्रमाला अत्यंत प्रभावी स्वरूप प्राप्त झाले.

      या सोहळ्याचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते आणि शाळेतील लाडक्या विद्यार्थिनींच्या उपस्थितीत करण्यात आलेले ‘पिंक रूम’चे भव्य उद्घाटन..! एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण येथील प्रकल्प अधिकारी श्रीम. तेजस्विनी गलांडे यांच्या कल्पकतेतून आणि अविरत मेहनतीतून ही “पिंक रूम” साकारली आहे.

     किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या अत्यंत संवेदनशील काळात हक्काचा आराम, स्वच्छता, आणि मानसिक बळ मिळावे या उद्देशाने वसतिगृहातील एका स्वतंत्र खोलीला अत्यंत सुसज्ज आणि सुंदर स्वरूप देण्यात आले आहे. या पिंक रूममध्ये प्रवेश करताच एका सुरक्षित वातावरणाची अनुभूती येते. मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तेथे आरामदायी बेड, गरम पाण्याची पिशवी (हिटिंग जेल बॅग), आणि पिण्याच्या गरम पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासोबतच प्रथमोपचार व औषध पेटी, आणि वजन काटाही ठेवण्यात आला आहे. केवळ भौतिक सुविधांवर न थांबता, मुलींमध्ये आरोग्यविषयक साक्षरता निर्माण करण्यासाठी या खोलीत ‘मासिक पाळीत काय करावे आणि काय करू नये’ याचे माहितीफलक लावण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ (गुड टच-बॅड टच) याविषयी जनजागृती करणारे फलक, या काळात करायचे योग्य व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेणारे मार्गदर्शनही अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी येथे इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान व प्रेरणादायी स्त्रियांची पुस्तके असलेले छोटे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाची सुरक्षितता आणि सर्व महत्त्वाचे आपत्कालीन हेल्पलाइन नंबर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन ही खोली मुलींसाठी खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित कवच’ बनली आहे.

      याचबरोबर शाळेमध्ये डिजिटल पॅनल वर्गांचे तसेच टॅब रूमचे उद्घाटन सुद्धा सचिव महोदय श्री.वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

      या उद्घाटन प्रसंगी ठाणे आदिवासी विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम आणि आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललित कुमार वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंक रूमच्या या अभिनव संकल्पनेची सविस्तर पाहणी केली आणि तिचे मनापासून कौतुक केले. सचिव विजय वाघमारे व इतर मान्यवरांनी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, शाळेच्या अधीक्षिका आणि नर्स यांना या सुविधेचा सुयोग्य वापर व व्यवस्थापनाबाबत विशेष मार्गदर्शन केले.

      यावेळी उपस्थित मान्यवरांच्या आणि चिमुरड्या मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद व हास्य या उपक्रमाच्या यशाची पावती देत होते.

या कौतुकास्पद सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचीही मोठी साथ लाभली. कार्यक्रमास जि.प. सदस्य श्री. नारायण धामसे व श्री. घारे , शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थिनींचे पालक तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     रानावनांतून आलेल्या या आदिवासी कन्या आपल्या डोळ्यांत स्वप्नांचे मोती घेऊन जेव्हा शाळेच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम या ‘पिंक रूम’च्या माध्यमातून पेण प्रकल्पाने केले आहे. हा उपक्रम आगामी काळात संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरेल यात शंका नाही. आपण सर्वांनीच या आदर्शवत उपक्रमाला नक्की भेट द्यावी.

    या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून देखील अशाच प्रकारची संकल्पना साकारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

मनोज सुमन शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी ठाणे/रायगड-अलिबाग आणि उपसंचालक (माहिती) (अ.का)विभागीय माहिती कार्यालय बेलापूर, नवी मुंबई 0000

संबंधित पोस्ट

आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा-रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

आज नांदुरा तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व ६ महसुली मंडळांमध्ये प्रत्येक मंडळाच्या एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रक्तदाब व मधुमेह रुग्णांना मोफत औषध पुरवठा…

टाटा मेमोरिअल सेंटरच्या रायगड मधील कर्करोग संशोधन केंद्राच्या रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्कात सवलत

सार्वजनिक आरोग्य विभाग‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद* १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी*७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी..