नवी मुंबई महानगरपालिकेची २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध, नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : यंदा प्रथमच ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार १०% अर्ली बर्ड सवलत; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग
नवी मुंबई महानगरपालिकेची २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध, नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : यंदा प्रथमच ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार १०% अर्ली बर्ड सवलत; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग
नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ८२६ कोटी इतका आत्तापर्यंतचा सर्वाधिक मालमत्ताकर संकलीत केला आहे. यापुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ताकर वसूलीचे १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होताच विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ताकर देयक वाटप प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कर देयके नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून शहराचा विकास अधिक सक्षमतने करण्याचा दृढ निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
यातील एक महत्वाचा बदल म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पासून वार्षिक मालमत्ताकर देयाकांचे वाटप वर्षातून एकदाच केले जाणार आहे. तसेच या नव्या आर्थिक वर्षात मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी खास प्रोत्साहन सवलत (अर्ली बर्ड स्कीम) जाहीर करण्यात आली आहे.
यासोबतच नव्या आर्थिक वर्षांत मालमत्ताकर ऑनलाईन भरण्याची सुविधा अधिक सक्षम करण्यात आली आहे. याशिवाय मालमत्ताकर देयकांचे वितरण करण्यासाठी बचत गटांच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मालमत्ताकर देयकांचे वाटप करण्यासाठी येणाऱ्या बचत गटाच्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
*आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध* नवी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांना आपले कराचे बील घरबसल्या, कुठेही आणि केव्हाही पाहता व भरता यावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ‘MY NMMC – माझी नवी मुंबई’ या ॲपवर मालमत्ताकर बिले उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नागरिकांनी आपले मालमत्ताकर बिल ३० जून २०२५ पर्यंत भरल्यास बिलातील सामान्य करावर १०% सवलतीचा लाभ मिळवता येणार आहे. ही मालमत्ता धारक नागरिकांसाठी सुवर्णसंधी आहे.
*वार्षिक मालमत्ताकर देयकांचे वाटप तातडीने पूर्ण करणार* साडेतीन लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारक असणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २०२४-२०२५ पर्यंत सहा महिन्यातून एकदा याप्रमाणे वर्षातून दोनदा घरपोच कर देयके वाटली जात होती. यामध्ये मालमत्ताकर विभागाकडे असणारा मोजका कर्मचारी वर्ग यांमुळे देयके वाटपास काहीसा विलंब होत होता. परिणामी मालमत्ताकर देयके नागरिकांपर्यंत उशीरा पोहोचून त्याचा परिणाम कर थकबाकी राहण्याकडे व्हायचा. हे टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीने नवी मुंबईमधील सर्व मालमत्ताकर देयाकांचे वाटप यंदा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार नव्या वित्तीय वर्षापासून संपूर्ण वर्षात एकदाच मालमत्ताकर देयकांचे वाटप सुनियोजित रितीने गतीमानतेने केले जाणार आहे.
*मालमत्ताकर देयक वाटपासाठी बचत गटांच्या महिला मदतीला* विहित मुदतीत मालमत्ताकर देयकांचे वाटप करणे तसेच मालमत्ताकर विभागाच्या करसवलतीच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चांगला लोकसंपर्क असणाऱ्या कुशल अतिरिक्त मनुष्यबळाच्या मदतीची गरज लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ताकर विभाग महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटांची मदत घेत आहे.
आपले बचत गटाचे काम सांभाळून मालमत्ताकर विभागासाठी काम करणाऱ्या या महिलांना नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी मालमत्ताकर देयकांच्या वाटपासाठी प्रवेश देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
*मालमत्तेला आपला मोबईल नंबर लिंक करा* बचत गटाच्या महिला जेव्हा बिल वाटपासाठी येतील तेव्हा त्यांना मालमत्ताधारक नागरिकांनी आपले मोबाईल नंबर आणि इमेल आयडी त्यांना अवश्य द्यावेत, जेणेकरून हे नंबर नागरिकांच्या मालमत्तेला जोडता येतील व पुढील मालमत्ताकर बिले एसएमएस संदेशाव्दारेही मिळू शकतील. नागरिक आपला मोबाईल नंबर आपल्या मालमत्तेला स्वत:ही संलग्न करू शकतात. त्यासाठी महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन QR CODE स्कॅन करावा आणि संबंधित माहिती भरावी असेही आवाहन आहे.*नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे यंदा प्रथमच मालमत्ताकरावर १० % ची सवलत योजना*
नव्या 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी खास प्रोत्साहन सवलत (अर्ली बर्ड स्कीम) जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीव्दारे ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास नागरिकांना मालमत्ताकर बिलातील सामान्य करावर १० % सवलतीचा लाभ घेता येईल.ऑनलाईन कर भरण्याची सुविधा मालमत्ताकर भरणा करणे सहज व सुलभ व्हावे, याकरिता भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) ही नवीन प्रणाली सुरू करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन बँकिंग, यूपीआय (UPI), क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट्स यासारखे विविध प्रकार/सूची उपलब्ध आहेत. नागरिक www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून तसेच My NMMC – माझी नवी मुंबई या ॲपवरून घरबसल्या करभरणा करू शकतात. या माध्यमांच्या वापरामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या सोयीप्रमाणे कुठूनही ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा करता येणार असून त्यांना कराचा भरणा केलेली पावती तात्काळ उपलब्ध होणार आहे. नवीन पेमेंट प्रणालीमुळे नागरिकांना करसंकलनाच्या विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागणार नसून नागरिकांच्या वेळेची बचत होऊन पेमेंट प्रक्रियेमध्ये सुलभता येणार आहे.
“यावर्षी मालमत्ताकर वसुलीला अधिक गतिमान आणि नागरिक सुलभ स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ‘एक वर्ष, एक बिल’ ही नवी प्रणाली, कर बिलांना केवायसी जोडणे, मालमत्ताकर बिलांची ऑनलाईन उपलब्धता, कर भरण्याच्या डिजीटल पद्धतींचा प्रभावी वापर आणि बिल वाटपात बचत गटांच्या महिलांचा सहभाग हे बदल करवसूली प्रणाली नागरिकांना सहजसोपी करण्याप्रमाणेच करवसूलीला नियोजनबध्दता आणि गतीमानता प्रदान करणारे आहेत. तरी नागरिकांनी बिल वितरणासाठी येणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे आणि ३० जून पूर्वी कर भरणा करून बिलात सामान्य करावर जाहीर केलेल्या १०% सवलतीचा लाभ घ्यावा आणि शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन आहे.” — डॉ. कैलास शिंदे,आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका