vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जपले जातेय घरेलू कामगार महिलांचे आरोग्यलाभार्थींनी मानले राज्य शासन, आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे आभार…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जपले जातेय घरेलू कामगार महिलांचे आरोग्यलाभार्थींनी मानले राज्य शासन, आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे आभार…

सांगली प्रतिनिधी- गोरगरीब घरेलू कामगारांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचे आरोग्य चांगले राहून जीवन सुसह्य व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत घरेलू कामगार आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय आरोग्य योजनांच्या एकत्रिकरणातून जिल्ह्यातील घरेलू कामगारांवर उपचार करण्यात येत आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मे महिन्यात या अभियानाची सुरवात झाली. 14 मे रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास तीन हजार घरेलू कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. केवळ तपासणी करून हे अभियान थांबले नाही, तर शिबिरात निदान झालेल्या आजारांवर मात करण्यासाठी विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून रूग्ण महिलांवर उपचार करून त्यांना ठणठणीत बरे करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व त्यांच्या टीमने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामकाज सुरू ठेवले आहे. त्यांना कामगार कार्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आदिंची साथ मिळाली. त्यामुळे तपासणी झालेल्या अनेक महिलांना पुढील उपचार मिळून त्यांचे आरोग्य जपण्यास मदत होत आहे.घरेलू कामगार हा महत्त्वाचा पण म्हटला तर तसा दुर्लक्षित घटक. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना पैसे व वेळेअभावी त्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यातून आयुष्याच्या उत्तरार्धात आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या महिलांना दिलासा देत, या अभियानातून घरेलू कामगारांत आत्मविश्वास पेरण्याचे काम होत आहे. उपचार झालेल्या लाभार्थींच्या बोलक्या प्रतिक्रियातून हे अधोरेखित होत असून, या महिलांनी राज्य शासन, आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

या अभियानांतर्गत बोरगाव येथील रूग्ण पार्वती आत्माराम महाडिक, (वय वर्षे 79) यांची सेवासदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्या म्हणाल्या, या उपचारासाठी मला कमीत कमी दीड लाख ते दोन लाख रूपये खर्च सांगितला होता. पण, आमची परिस्थिती हलाखीची आहे. काम केल्याशिवाय पोटाला अन्न मिळत नाही. तिथे उपचारासाठी पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न होता. मात्र, घरेलू कामगार आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळाल्याने मला नवसंजीवनी मिळाली.

या अभियानातून माधवनगर येथील छाया गजानन टिंगरे (वय वर्षे 60) यांची स्पाइन सर्जरी आणि फिजिओथेरपी कुल्लोळी हॉस्पिटल येथे पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. त्यांच्या पतीचे निधन झाले असून उदरनिर्वाहासाठी त्या तीन ते चार घरात घरकाम करतात. त्यामध्ये त्यांना मणक्याचा त्रास अधिक होता. त्यांना मेडिसिन, रेडिओलॉजी, ऑर्थोपेडिक आणि ॲनेस्थेशिया असे जवळपास चार वेगवेगळे विभाग संलग्नित जवळपास दीड ते दोन लाखापर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांचे उपचार जवळपास पूर्ण झाले आहेत. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आभार मानले आहेत.

उपजिल्हा रूग्णालय, इस्लामपूर येथे मैमुनबी जावेद सैधेखान (वय वर्षे 60) यांना गर्भाशयाच्या पिशवीचा आजार होता. त्यांना रक्कम रूपये 50 ते 60 हजार रूपये खर्च येणार होता. त्यावरील उपचारही पूर्णपणे मोफत करण्यात आले.

वाळवा तालुक्यातील गोंडवाडी येथील प्रियांका मोहन शेवाळे (वय वर्षे 21) यांचे वडील शेतकरी आहेत. आई सविता शेवाळे घरेलू कामगार असून, त्या तीन ते चार घरात काम करतात. प्रियांका शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दिव्यांग (80 टक्के) आहेत. त्यांच्याकडे शासकीय रूग्णालयाचे दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा आहे. वसंतदादा दंत रूग्णालयामध्ये प्रियांका यांच्यावर दातांची आणि जबड्याची बरीच मोठी ट्रीटमेंट करण्यात आली. संपूर्ण उपचारासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. यामध्ये मेडिसिन, रेडिओलॉजी, ओरल सर्जरी, ऑर्थोडोंटिक्स, पेरिओडेंटिक्स आणि प्रोस्थोडेंटिक्स असे जवळपास सहा वेगवेगळे विभाग संलग्नित रूट कॅनल, हिरडी व जबड्याची शस्त्रक्रिया असे आजवर जवळपास 15 हजार रूपयांचे उपचार मोफत करून देण्यात आले आहेत. अजूनही जवळपास दीड लाख रूपयांचे उपचार शिल्लक आहेत. उर्वरित उपचार पूर्ण होण्याकरिता आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

उपचार झालेल्या व होत असलेल्या लाभार्थींनी याबाबत आवर्जून ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत. इतरांची सेवा करणाऱ्या या वर्गाला या माध्यमातून आरोग्य दिलासा मिळाला आहे.

संप्रदा बीडकर जिल्हा माहिती अधिकारी   सांगली 00000

संबंधित पोस्ट

१ डिसेंबर : ३७ वा जागतिक एड्स दिन — अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta