मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 33 वाघ आणि शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन..
अमरावती, प्रतिनिधी: निसर्ग प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, असा ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात पार पडला. पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात सलग 12 तास घनदाट वनातील 264 मचाणांवर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या निरीक्षणाचा थरारक अनुभव निसर्गप्रेमींनी मनमुरादपणे लुटला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट वन्यजीव, अकोला आणि पांढरकवडा या सहा वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही पर्यटकांनी मोठ्या संख्येने गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली होती.
या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात 30 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 413 रानगवा, 856 सांबर आणि 121 नीलगाय या वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तसेच पांढरकवडा वन्यजीव विभागात 3 वाघ, 2 बिबट, 164 रानडुक्कर, 25 अस्वल, 67 नीलगाय व 153 चितळ दिसून आले. अकोला वन्यजीव विभागातही 16 बिबट, 25 अस्वल, 2 तडस, 23 कोल्हा, 60 रानडुक्कर, 202 चितळ आणि 365 नीलगाय असे वैविध्यपूर्ण वन्यजीव पर्यटकांच्या दृष्टीस पडले. मचाणावर बसण्यापूर्वी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पर्यटकांना आवश्यक सूचना दिल्या होत्या आणि प्रत्येक निसर्गप्रेमीसोबत सुरक्षेसाठी वन कर्मचारी व निरीक्षणासाठी पत्रक देण्यात आले होते.
रात्रीच्या वेळी जंगलात शांतता, रातकिड्यांची किरकिर आणि हवेची झुळूक अशा नैसर्गिक वातावरणात वन्यजीवांना जवळून पाहणे, हा पर्यटकांसाठी एक विलोभनीय अनुभव ठरला. पौर्णिमेच्या प्रकाशात उजळलेले मेळघाटचे घनदाट जंगल आणि प्राण्यांचे आवाज यामुळे सहभागी पर्यटक भारावून गेले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि वनविभागाच्या सहकार्याबद्दल पर्यटकांनी समाधान व्यक्त करत, वाघांना व इतर वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात अनुभवल्याचा विशेष आनंद व्यक्त केला आहे.