ज्ञानज्योती सावित्रीबाईफुले आधार व पंडित दिन दयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत
रायगड-अलिबाग प्रतिनिधी पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिन दयाल उपाध्याय स्वयंमयोजना या दोन योजना सुरु केलेल्या आहेत. या योजनेकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण रायगड-अलिबाग श्रीमती मोनिका काळे यांनी केले आहे.
काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिन दयाल उपाध्याय स्वयंम योजना ?
अटी व शर्ती :- व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसहित उत्तीर्ण असणे आवश्यक. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस या योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/CGPA चे गुण असणे आवश्यक राहील. या योजनांतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के असावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विदयार्थी रहिवाशी नसावा. खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यास असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि, उपरोक्त 5 वर्षाचा कलावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यांत येईल.
आवश्यक कागदपत्रे :- भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र/करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा. बँकेचे खाते क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असावे. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लक्ष पेक्षा जास्त नसावे. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला भटक्या जमाती-क प्रवर्गाचा जातीचा दाखला/तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैध जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
योजनेंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा 50 टक्के इतकी राहील व यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार? मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याासाठी भोजन भत्ता-रु.32 हजार, निवास भत्ता-रु.20 हजार, निर्वाह भत्ता रु.8 हजार अनुज्ञेय आहे. इतर महसूली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगर पालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता-रु.28 हजार, निवास भत्ता-रु.15 हजार, निर्वाह भत्ता रु.8 हजार अनुज्ञेय आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी.परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी भोजन भत्ता-रु.25 हजार, निवास भत्ता-रु.12 हजार, निर्वाह भत्ता रु.6 हजार अनुज्ञेय आहे. तालुक्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम (2,3 व 4मधील क्षेत्र वगळून इतर क्षेत्र) भोजन भत्ता-रु. 23 हजार, निवास भत्ता-रु.10 हजार, निर्वाह भत्ता रु.5 हजार अनुज्ञेय आहे.
कोठे करायचा अर्ज ?ज्ञानज्योती सावित्रीबाईफुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर सादर करावा व यासंबंधी माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि. रायगड या कार्यालयात दिली जाईल.