vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

    अकोला, प्रतिनिधी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावी, तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा अकोला जिल्ह्यात पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.

   कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, शिक्षणाधिकारी योजना संजयकुमार झापे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.रत्नमाला खडके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद टेकाडे,सुभाष भालेराव,प्राथमिक उपशिक्षणाधिकारी जितेंद्र प्रधान, विस्तार अधिकारी विनोद मानकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, यंदा राज्य शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहणार आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रप्रमुखांना सीसीटीव्ही बसविण्याबाबत लेखी सूचना द्याव्यात. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याचे आढळून येईल, त्या ठिकाणी शिक्षकांची अदलाबदल करण्यात येईल, तसेच संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

परीक्षा काळात वीजेचे भारनियमन झाल्यास बॅटरी किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था ठेवावी. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांच्या परिसरात व्हिडीओ शुटींग, भरारी पथक व बैठ्या पथकांमार्फत विशेष तपासणी करण्यात येणार आहे. अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाच्या विषयांच्या दिवशी कॉपीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

 

परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश,    परीक्षा काळात सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. या आदेशानुसार सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी/मोबाईल केंद्र, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र तसेच ध्वनिक्षेपके बंद राहणार आहेत. मात्र, परीक्षार्थी, परीक्षा कामकाजाशी संबंधित अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व पोलीस यांना हा आदेश लागू राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कॉपी आढळल्यास कठोर कारवाई,   कोणताही परीक्षार्थी कॉपी किंवा गैरवर्तन करताना आढळल्यास त्याच्याविरोधात पोलीस गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच संबंधित विषयाचा निकाल रद्द करण्यात येईल. गंभीर प्रकरणात संपूर्ण परीक्षेचा निकालही रद्द केला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे

दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान असून, विद्यार्थी संख्या 26 हजार 353 व केंद्र संख्या 118 आहे. बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान असून, विद्यार्थी संख्या 26 हजार 287 व केंद्र संख्या 87 आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत दक्षता समिती स्थापण्यात आली आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अमरावती विभागात विभागीय आयुक्त, शिक्षण उपसंचालक, जिल्ह्यात जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, योजना शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात आली आहेत.

पेपर वितरण केंद्र परिरक्षक 11 आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांच्या ठिकाणी दहावी परीक्षेसाठी 21 व बारावीसाठी 22 बैठी पथके आहेत.

०००

संबंधित पोस्ट

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतुकीत बदल

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ  

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

vishwatmaklokswamivarta

व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

vishwatmaklokswamivarta