
मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्याची 31 ऑगस्टची मुदत
सांगली, प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह, सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 आहे. या वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे वसतिगृह प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे
कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सांगली येथील मीरा हौसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली या संस्थेच्या इमारतीमध्ये हे वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वसतिगृहात एकूण 93 जागा उपलब्ध असून त्यामध्ये माध्यमिक विभाग (इयत्ता 8 वी ते 10 वी) साठी 20, उच्च माध्यमिक विभाग (इयत्ता 11 वी व 12 वी) साठी 23, महाविद्यालयीन विभाग (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.) साठी 30 आणि आयटीआय साठी 20 जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी अर्ज वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज (शाळा अथवा महाविद्यालयामध्ये प्रवेशाबाबत प्राचार्यांच्या प्रमाणपत्रासह), सन 2025-26 या आर्थिक वर्षातील रु. 1 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला (मूळ प्रत), मागील परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिकाची सत्यप्रत, गाव कामगार पोलीस पाटील यांचा वर्तणुकीचा दाखला (मूळ प्रत), गाव कामगार तलाठी यांचा रहिवाशी दाखला (मूळ प्रत), मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सादर करणे आवश्यक आहे.
विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीखेरीज वसतिगृह कार्यालयात मिळतील, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000



