vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूर येथे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणआपण सर्व संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूर येथे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणआपण सर्व संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपण सर्वजण जाणता की, आज आपण जो स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत, जगतो आहोत, आज आपला स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. ज्या काळामध्ये अनेक राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारत होते, स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती, गुलामीत राहणे पसंत करत होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव, देश आणि धर्मासाठी लढायचे आहे. कितीही मनसबदारी मिळाली, सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचा नोकर म्हणून आपल्याला काम करायचे नाही तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेले हे जे संकट आहे ते दूर सारून या मराठी मुलुखाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावेच लागेल.

ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुघलांच्या फौजेमध्ये इराणी, अफगाणी, उज्बेकिस्तान, बलुचिस्तान या सगळ्या भागातले मोठमोठे सरदार होते, त्यांना मोठमोठा पगार होता. ते पगारी नोकरदार होते, लढणे हा त्यांचा व्यवसाय होता. मोठा प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता. पण आपले मावळे मात्र अर्धपोटी राहून लढायचे. पण फरक काय होता, तर मुघलांचे सैन्य हे पगारार्थ लढायचे आणि आपले मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढायचे. त्यांना माहिती होतं, ज्या राजाकरता आपण लढतोय तो स्वतःसाठी लढत नसून आपल्या जनतेला मुघलांच्या जाचातून बाहेर काढण्यासाठी लढतो आहे. त्यामुळे लाखाची फौज घेऊन मोघल आक्रमक यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 हजार मावळे त्या फौजेला नामशेष करायचे. याचे कारण त्यांच्यामध्ये जी क्रांती, जे तेज छत्रपती शिवरायांनी पेरलं होतं त्यामुळेच खऱ्या अर्थाने ही लढाई ते जिंकू शकायचे.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक चांगले योद्धे म्हणूनच मर्यादित नसून ते एक उत्तम प्रशासक देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पाण्याचे नियोजन, जंगलांचे नियोजन, बांधलेले किल्ले आणि तयार केलेले आरमार यातील प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर कोणाकडून कर घ्यायचा व कोणाकडून घेऊ नये, कशा पद्धतीत कर घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये, ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते. हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा नसून प्रेरणेचे स्थान आहे. एक असे स्थान आहे ज्यातून प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करायची आहे.

ते पुढे म्हणाले की,बदलापूरसाठी एमएमआरडीएकडून विकासकामांचा निधी येईल आणि विकास होण्यास होईल. पाण्याच्या योजनेचा प्रस्तावास नगरविकास विभागाकडून मंजुरी घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. उल्हास नदीवर काही धरणं देखील बांधत आहोत. त्यामुळे पूररेषा निश्चितपणे कमी होणार आहे. उल्हास नदीच्या खोलीकरण व गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल. या कामासाठी ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील. अस्वच्छ पाणी स्वच्छ करून त्याचे योग्य नियोजन केले जाईल. तसेच मेट्रोच्या कामाला देखील गती देण्यात येईल.

आमदार किसन कथोरे हे आपल्या मनोगतात म्हणाले की, बदलापूर शहराला शिवकालीन इतिहास आहे. उल्हास नदीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल.यावेळी लाडक्या बहिणींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला.00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षा आवेदनपत्रासाठी 3 ऑक्टोबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-सावधान….! भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

vishwatmaklokswamivarta