
नक्शा’ पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ ड्रोन सर्वेक्षण होणारØ जमिनींचे ३डी नकाशे, मिळकत पत्रिका तयार होणार जागेची सीमा निश्चित होण्यास मदत..
बुलढाणा, प्रतिनिधी (जिमाका): शहराच्या नगरपरिषद हद्दीतील मिळकतींचे नकाशे व मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने बुलढाण्यात ‘नक्शा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय व भूमि संसाधन मंत्री शिवराजसिंह चव्हाण, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातून मंगळवारी ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रकल्पाचा जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शुभारंभ झाला.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, भूमि अभिलेख उपसंचालक डॉ लालसिंग मिसाळ, उप विभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नरेंद्र झांबरे, जिल्हा सह आयुक्त जी.एस.पेंटे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे उपस्थित होते. डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ‘नक्शा’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून हा प्रकल्प राज्यातील पंढरपूर (सोलापुर), बारामती (पुणे), कुळगाव बदलापूर (ठाणे), शिर्डी (अहमदनगर), वरणगाव (जळगाव), कन्नड (छ. संभाजीनगर), बुलढाणा, घुग्घस (चंद्रपुर), खोपोली (रायगड), मुर्तीजापुर (अकोला) या शहरात राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत नगरपरिषद भूमापन न झालेल्या जमिनीचे भूमापन करून मिळकत पत्रिका व मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. मिळकतीचा नकाशा व सिमा निश्चित होवून मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल, अशा मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद हद्दीतील रस्ते, नगरपरिषदेच्या मालकीच्या खुल्या जागा, नाला यांच्या सिमा निश्चित करण्यात येईल. नगरपरिषद हद्दीतील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होवून सर्व कार्यपध्दती पारदर्शकपणे राबविली जाणार असून नागरिकांना अभिलेख सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्प तीन टप्प्यात :‘नक्शा’ प्रकल्प हा नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील मूळ आणि विस्तारित भागांचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण करून जीआयएस आधारित ३डी नकाशे आणि मिळकत पत्रिका तयार करणे. मिळकत कर नोंदवही अद्ययावत करणे. नगरपरिषद आणि भूमि अभिलेख विभागाकडील उपलब्ध सर्व प्रकारच्या नकाशांचे जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून सुसूत्रीकरण करणे या तीन टप्प्यात राबविला जाणार आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना होणारे फायदे :धारक अधिकार अभिलेखाचे जीआयएस आधारीत नकाशे व मिळकत पत्रिका तयार होतील. मिळकतींचा नकाशा तयार होऊन त्यांचे क्षेत्र व अक्षांश-रेखांश सहित सीमा निश्चित होतील. नागरिकांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल. मिळकत पत्रिकेच्या स्वरुपात अधिकार अभिलेख तयार झाल्यामुळे मिळकतीवर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतीबाबतचे न्यायालयीन दावे कमी होण्यास मदत होईल. नागरिकांची आर्थिक पत उंचावण्यास मदत होईल.
बुलढाणा शहरात ‘नक्शा’ हा पथदर्शी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश भूमि अभिलेख विभाग आणि नगरपरिषदेला देण्यात आले आहेत. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
0000
—



