खासगी क्रीडा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, प्रतिनिधी: राज्यातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिभावान खेळाडू तयार करण्यासाठी मिशन लक्ष्यवेध योजना सुरू केली आहे. यासाठी इच्छुक संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील निवडक खासगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यात अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती अशा 12 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या क्रीडा प्रकारांमधील उत्कृष्ट खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
आर्थिक सहाय्य देण्यासाठी अकादमींचे निकषांवर मूल्यांकन केले जाईल. यात खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, पायाभूत सुविधा, क्रीडा साहित्य आणि अकादमीच्या कामगिरीचे गुणांकन यांचा समावेश आहे. अकादमींना त्यांच्या गुणानुसार अ, ब आणि क वर्गामध्ये विभागले जाईल. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक 10 लाख रुपये, ‘ब’ वर्ग अकादमींना 10 लाख रुपये आणि ‘अ’ वर्ग अकादमींना 30 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल. हे सहाय्य पायाभूत क्रीडा सुविधा उभारणे, प्रशिक्षक मानधन आणि क्रीडा उपकरणे खरेदी करण्यावर खर्च करावा लागणार आहे.
इच्छुक संस्थांनी अधिक माहिती आणि अर्जाच्या नमुन्यांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.