vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण..

नवी दिल्ली, प्रतिनिधी : भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-6) खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली.

बुलेट ट्रेनच्या 508 किमीच्या या प्रकल्पात महाराष्ट्रात एकूण सात बोगदे प्रस्तावित आहेत, त्यापैकी पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड परिसरातील 454 मीटर लांबीच्या ‘माउंटेन टनेल-6’ (MT-6) या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सकाळी 11.14 वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या साफल्य पूर्तीची थेट पाहणी केली आणि या यशाबद्दल प्रकल्पातील अभियंते व कामगारांचे विशेष अभिनंदन केले.

न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ तंत्रज्ञानाचा वापर

पालघरमधील हे खोदकाम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जात होते. पालघरमधील डोंगराळ भागातील कठीण पाषाण आणि भौगोलिक गुंतागुंत लक्षात घेता, येथे मोठी टनेल बोअरिंग मशीन्स वापरणे अशक्य होते. अशा वेळी भारतीय अभियंत्यांनी ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. नियंत्रित स्फोट आणि अचूक ड्रिलिंगच्या साहाय्याने अवघ्या 12 महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले.,

हा बोगदा 14.4 मीटर रुंद असून यामध्ये बुलेट ट्रेनचे येणारे आणि जाणारे दोन्ही ट्रॅक सामावले जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. खोदकामादरम्यान रिअल-टाइम मॉनिटरिंग, अत्याधुनिक वायुविजन (Ventilation) आणि अग्निशमन यंत्रणांची चोख व्यवस्था करण्यात आली.

एकूण 508किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा आढावा घेताना रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांनी सांगितले, आतापर्यंत 334 किमी लांबीचे पूल (Viaduct) आणि 417 किमीचे पिलर (खांब) उभारण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. गुजरात राज्यातील कामाची गतीही चांगली असून तेथे ट्रॅक टाकणे आणि विद्युतीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. सुमारे 125 रूट किलोमीटर क्षेत्रात 5,400 हून अधिक ओव्हरहेड इलेक्ट्रिक मास्ट लावण्यात आले आहेत. याशिवाय, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याचे कामही प्रगतीपथावर असून त्यातील 5 किमीचे उत्खनन पूर्ण झाले आहे.

देशात आणखी सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉर,अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील तरतुदींची देखील यावेळी माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरनंतर देशात आणखी सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. यामुळे पुणे ते हैदराबाद हे अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांत, तर चेन्नई ते बेंगळुरू हे अंतर 1 तास 13 मिनिटांत पार करणे शक्य होईल. या प्रकल्पांमुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही, तर मालवाहतूक कॉरिडॉरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाढवण बंदर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अंतर्गत भागांशी जोडले जाऊन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

आजचा हा ‘ब्रेकथ्रू’ म्हणजे केवळ एका बोगद्याचे काम पूर्ण होणे नसून, भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या ताकदीचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई आणि अहमदाबादमधील अंतर अवघ्या दोन तासांत कापले जाणार असून, प्रवाशांना विमानासारखा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल.

0000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ११ फेब्रुवारीला होणार निवड.

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक