मेळघाट प्रादेशिक वनविभागाचा उपक्रमचिचाटी धबधब्याकडे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती सुरू; स्थानिक २० युवकांना मिळाला रोजगार…
अमरावती, प्रतिनिधी मेळघाट प्रादेशिक वन विभाग, परतवाडा अंतर्गत येणाऱ्या घटांग वन परिक्षेत्रातील चिचाटी गावातील ‘चिचाटी धबधबा’ येथे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती (गाइडेड नेचर ट्रेल) सुरू करण्यात आली आहे. अवघ्या दोन आठवड्यात ६०० पर्यटकांनी भ्रमंती केली असून स्थानिक २० युवकांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
निसर्गप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ जुलै २०२६ पासून ही भ्रमंती अधिकृतपणे सुरू झाली आहे. चिचाटी ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाचे व्यवस्थापन ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती, चिचाटी’ द्वारे केले जात आहे. चिचाटी गाव ते चिचाटी धबधबा यादरम्यानचा ४ कि.मी.चा मार्ग निसर्गसौंदर्याने नटलेला असून पर्यटकांसाठी हे मुख्य आकर्षण ठरत आहे.
पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्थानिक रोजगार २५ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला निसर्गप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत तब्बल ६०० हून अधिक पर्यटकांनी या निसर्ग भ्रमंतीचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे चिचाटी गावातील २० स्थानिक युवकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे
निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. सुरक्षेच्या व माहितीच्या दृष्टीने पर्यटकांसोबत चिचाटी गावातील स्थानिक निसर्ग मार्गदर्शक (गाईड) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.या भ्रमंतीसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारले जात आहे. स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी धारणी व चिखलदरा तालुक्यातील स्थानिक नागरिकांसाठी हे शुल्क सवलतीच्या दरात १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या शुल्कातच निसर्ग मार्गदर्शकाचे मानधन अंतर्भूत आहे.
अमरावतीहून चिचाटी धबधब्याकडे जाण्यासाठी अमरावतीहून परतवाडा आणि पुढे धामणगाव गढी मार्गे देवगाव आणि चिचाटी येथे पोहचता येते. जास्तीत-जास्त निसर्गप्रेमींनी या मार्गदर्शित भ्रमंतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.