श्री मावळी मंडळ हायस्कूलचा डिजीटल बोर्डसाठी ‘फॅसिलिटी फी’चा पालकांकडे आग्रह फी न भरल्यास पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा पालकांचे जिल्हा शिक्षणाधिकार्यांना निवेदन
श्री मावळी मंडळ हायस्कूलचा डिजीटल बोर्डसाठी ‘फॅसिलिटी फी’चा पालकांकडे आग्रह फी न भरल्यास पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा पालकांचे जिल्हा शिक्षणाधिकार्यांना निवेदन
ठाणे प्रतिनिधी ः श्री मावळी मंडळ हायस्कूल, चरई या शाळेतील पालकांकडून डिजीटल बोर्डसाठी ‘फॅसिलिटी फी’ची मागणी सन 2024 मधील शैक्षणिक वर्षात करण्यात आली होती. ही फी शाळा जोपर्यंत पाल्य शाळेत आहे तोपर्यंत भरण्याची मागणी करीत आहे. मात्र पालकांनी ही फी भरण्यास असमर्थता दर्शविली होती. तरी शाळेच्या व्यवस्थापकांकडून सातत्याने फी भरण्याचा आग्रह केला जात आहे. दरम्यान 22 एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा दिला होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका दाखविण्यापासून रोखल्याचे काही पालकांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून फी कधी भरताय असे लेखी कागदावर लिहूनही घेण्यात आले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकांनी आज ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांची भेट घेवून पालकांच्या सह्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी सोबत आमदार अॅड. निरंजन डावखरे उपस्थित होते. त्यांनीही पालकांच्या प्रश्नावर शिक्षणाधिकार्यांशी चर्चा करून सदर विषयाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. दरम्यान, मंगळवारी उपशिक्षणाधिकारी यांची शाळेच्या सीईओंसोबत मिटींग आयोजित केली असून यावेळी पालकांचे प्रतिनिधी या मिटींगला उपस्थित राहून यावर चर्चा करणार असल्याचेही दहीतुले यांनी सांगितले.
गेल्यावर्षी 2024 मध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी सदर शाळेकडून 15% फी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पालकांनी कोणतीही सबब न सांगता फी वाढीला मंजूरी दिली. दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होत असताना शाळेमध्ये डिजीटल बोर्ड प्रत्येक वर्गात बसविण्याबाबत शाळेचे सीईओ श्री. नरेंद्र पाठक यांनी पालकांना शाळेच्या मुख्य सभागृहात सभा घेत अवगत केले. मात्र या डिजीटल बोर्डचा खर्च जास्त असून शाळेला हा खर्च करणे आवाक्याच्याबाहेर असल्याचे सांगत पहिलीच्या विद्यार्थ्यांना रुपये 10,000/- प्रमाणे फी भरण्यास सांगितले. विशेष म्हणजे ही फी प्रति वर्ष भरण्याचे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे. त्याप्रमाणे पहिलीपासून दहावीपर्यंत पालकांना वेगवेगळ्या रकमा सांगण्यात आल्या. ही रक्कम ‘फॅसिलिटी फी’ या नावाने जमा करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र पालकांनी या ‘फॅसिलिटी फी’ला विरोध करत फी न घेण्याबाबत शाळेला सांगितले. कारण सन 2024 मध्ये शाळेने 15 टक्के फी वाढ केली होती. त्याव्यतिरिक्त डिजीटल बोर्डसाठी अशा रितीने फी देण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, शाळेच्या सीईओंची पुन्हा एकदा मिटींग घेत पालकांसोबत मिटींग घेवून पालकांना ही भरण्याचा आग्रह सीईओंकडून करण्यात आला.
फी कमी करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला असता शाळा व्यवस्थापन पत्रव्यवहार स्वीकारण्यास टाळाटाळ करते व पत्र स्वीकारल्यास त्याची पोच देत नाही. पालकांनी विविध प्रकारे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. कारण या शाळेने 2024 मध्ये 15% फी वाढ केल्याने पालकांच्या खिशाला कात्री लागली होेती. तसेच शाळेत शिकणार्या पाल्यांचे पालक हे सर्वसामान्य कुटुंबातील असून वाढत्या महागाईमध्ये वाढीव फॅसिलिटी फी भरणे पालकांच्या आवाक्याबाहेर असून ज्या पालकांची 2 किंवा 3 मुले या शाळेत शिकत आहेत. त्यांचे तर आर्थिक गणितच कोलमडणार आहे. पालकांचा विरोध असतानाही शाळेकडून फी भरण्याचा आग्रह केला जात आहे. दरम्यान 22 एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. म्हणूनच आज ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून पालकांनी निवेदन दिले. यावेळी आमदार अॅड. निरंजन डावखरे उपस्थित होते. त्यांनीही पालकांचे म्हणणे ऐकून घेत या फॅसिलिटी फी बाबत शाळेशी योग्य ती चर्चा करून पालकांना न्याय देण्याच्या सुचना केल्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी भाउराव मोहितेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, वर्षभरात काही पालकांना वैयक्तिक शाळेत बोलावून सीईओंकडून फी भरण्याबाबत दबाव टाकण्यात आला. आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये त्याच्या शिक्षणात अडथळा येवू नये म्हणून काही पालकांनी फॅसिलिटी फी जमा केली आहे. मात्र ही फी रोख भरताना एका कोर्या कागदावर पावती लिहून देण्यात येत असल्याचे काही पालकांनी सांगितले. त्या पावतीवर ना शाळेचे नाव, ना शिक्का ही बाब पालकांनी अवगत केली आहे.
दरम्यान, नुकताच शाळेत पालकांचा ओपन डे घेण्यात आला. यावेळी ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांना विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका दाखविण्यापासून रोखल्याचे काही पालकांनी सांगितले. तर यावेळी पालकांकडून एका कागदावर फी कधीपर्यंत जमा करणार आहात? असे सही करून लिहून घेण्यात आले. तसेच जे पालक फॅसिलिटी फी जमा करणार नाहीत त्यांच्या पाल्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेदेखील शिक्षकांकडून पालकांना सांगण्यात आले. पालकांकडून शाळेच्या वाढीव फीबाबत कोणताही आक्षेप नाही. फॅसिलिटी फी च्या नावाखाली करण्यात येणारी सक्तीची वसुली रद्द करावी किंवा सदर रक्कम कमी करून पालकांना सुलभ होईल, अशी फी आकारणी करावी, अशी सर्व पालकांची विनंती आहे.
शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत असलेल्या विकासत्मक धोरणांना पालकांचा कधीही विरोध नाही. आमच्या पाल्यांना शाळेकडून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे यात तिळमात्र शंका नाही. पण फॅसिलिटी फीचा बोजा पालकांवर लादू नये हीच विनंती.पालकांनी दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.