
राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत
रत्नागिरी, प्रतिनिधी: राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, त्याला जे बियाणे देतो ते अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीची असली पाहिजेत, याची नोंद अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद व कृषी विभाग नाविण्यपूर्ण घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भात व नाचणी पिकाचे मोफत बियाणे , सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंबा वितरकांना चारचाकी वाहन वितरण तसेच नागरी सुविधा योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 80 सीएनजी घंटागाड्यांचे वितरण आज उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेल्या तीन वर्षांमध्ये रत्नागिरी मध्ये लोक अभिमुख विकास प्रकल्प उभे राहिले आहेत. दिलेला निधी विकास कामांना वापरा एवढी माझी अट होती. कामाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे. वेळेमध्ये काम पूर्ण झाले पाहिजे. ही माफक अपेक्षा ठेवून निधी दिला. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या निधीचे वाटप झालं, त्याची कामं आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. कुठेही आम्ही मागे राहणार नाही एवढाच विश्वास आपल्याला देऊ इच्छितो.



