vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नमुंमपा ईटीसी केंद्राच्या मदतीने सात महिन्यांच्या बाळाची कॉक्लियर इम्प्लान्ट (Cochler Implant) सर्जरी यशस्वी

नमुंमपा ईटीसी केंद्राच्या मदतीने सात महिन्यांच्या बाळाची कॉक्लियर इम्प्लान्ट (Cochler Implant) सर्जरी यशस्वी

 

     आरोग्य प्रतिनिधी     नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राद्वारे सर्व प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गातील मुलांना शिक्षण, प्रशिक्षण व विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सर्व प्रवर्गातील दिव्यांग मुले व प्रौढांकरिता त्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन ईटीसी केंद्राने विविध योजना तयार केलेल्या आहेत. यामध्ये लाभार्थी नवी मुंबईचा दिव्यांग रहिवासी असावा ही एकच मुख्य अट आहे. या व्यतिरिक्त इतर काही माफक अटी, शर्तींची पूर्तता केल्यानंतर दिव्यांग मुले व प्रौढांना याचा लाभ घेता येतो.

          यातीलच एक योजना कॉक्लियर इम्प्लान्ट (Cochler Implant) सर्जरी ही आहे. ज्या मुलांना पूर्णत: कर्णबधिरत्व असते, अशा मुलांना लहान वयात कॉक्लियर इम्प्लान्ट सर्जरीद्वारे ऐकता येऊ शकते. ही सर्जरी अत्यंत क्लिष्ट असून यासाठी येणारा खर्चही मोठा आहे. ही बाब लक्षात घेऊन ईटीसी केंद्राकडून दिव्यांगांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांमध्ये कॉक्लिअर इम्प्लान्ट या एका प्रमुख योजनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या योजने अंतर्गत कर्णबधिरांना कॉक्लिअर इम्प्लान्ट सर्जरी किंवा सी.आय.प्रोसेसर करिता 3,50,000 ते 5,50,000 पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचा लाभ मिळाल्याने वल्लभ हांडे या केवळ सात महिन्याच्या मुलाची कॉक्लिअर इम्प्लान्ट सर्जरी यशस्वी झाली आणि वल्लभ हा जगातील कॉक्लिअर इम्प्लान्ट सर्जरी झालेल्या सर्वात लहान बाळांपैकी एक ठरला आहे.

          नवी मुंबईचे रहिवासी असणा-या श्री.दिलीप हांडे यांना आपले लहान बाळ वल्लभ हा कर्णबधीर असल्याचे लक्षात आले व त्यांनी त्या संबंधित वैदयकीय उपचारांची त्वरित सुरुवात केली. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सर्व चाचण्या होऊन वल्लभ हा नैसर्गिकरित्या ऐकू शकणार नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे हांडे परिवाराने वल्लभची कॉक्लियर इम्प्लान्ट सर्जरी करण्याच्या पर्यायाचा विचार केला. मात्र या सर्जरीसाठीचा खर्च हा खूप जास्त असून, ही सर्जरी क्लिष्ट असल्याने त्यांच्या मनात याबाबत संभ्रम होता.

          त्यामुळे या संदर्भात माहिती घेण्यासाठी ते नमुंमपा ईटीसी केंद्रामध्ये आले असता ईटीसी केंद्रातील कर्णबधीर विभागातील एव्हीटी थेरपिस्ट तथा कर्णबधिर विभाग प्रभारी शैक्षणिक व्यवस्थापक श्रीम. विद्या कदम यांनी या सर्जरीचे महत्व, सर्जरीपूर्वी व नंतर घ्यावयाची काळजी याबाबत त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सर्जरीविषयीही माहिती देत सर्जरीसाठी कुटुंबियांची मानसिक तयारी करून घेतली. सर्जरीनंतर वल्लभला व्यवस्थित ऐकू येईल असा विश्वासही दिला. त्यासोबतच ईटीसी केंद्राच्या योजना विभागातील समाजसेवक श्रीम.सुमित्रा गायकवाड यांनी याबाबतच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली व त्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले.

          त्यानुसार 23 ऑगस्ट 2025 रोजी वल्लभची शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी ईटीसी केंद्रातील एव्हीटी थेरपिस्ट या सर्जरी होताना ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या. तसेच सर्जरी पूर्ण झाल्यावर ईटीसी केंद्र संचालिका डॉ. अनुराधा बाबर, समाजसेविका सुमित्रा गायकवाड, केंद्राच्या अधिक्षक श्रीम. मनीषा पवार या सर्वांनी पालकांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले. यानंतर 16 सप्टेंबर 2025 रोजी वल्लभचे कॉक्लियर इम्प्लान्ट स्वीच ऑन करण्यात आले. वल्लभ आता दोन्ही कानांनी ऐकू शकत आहे याची तपासणी होऊन डॉक्टरांनी ही अतिशय लहान बालकाची सर्जरी यशस्वी झाली असल्याचे जाहीर केले.

          सर्जरीनंतर आपल्या मुलाला ऐकू येत असल्याचे जाणून श्री.दिलीप हांडे यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. ईटीसी केंद्राकडून दक्षतेने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून आम्हां कुटुंबियांचे मनोबल वाढविले. या योजनेमुळे वल्लभच्या सर्जरीसाठी पैशाची व्यवस्था करणे आम्हाला सुसह्य झाले, याबद्दल त्यांनी ईटीसी टीमचे मन:पूर्वक आभार मानले.

          ईटीसी केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा बाबर यांनी दिव्यांगत्वावर मात करून त्यांना सामान्य जीवन उपलब्ध करून देण्यासाठी ईटीसी केंद्र हे शिक्षण, प्रशिक्षण, उपचार सुविधा आणि योजना अशा सर्व प्रकारे दिव्यांगांच्या मदतीसाठी कायमच पुढे असल्याचे सांगितले. मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून कॉक्लियर इम्प्लान्ट सर्जरीसाठी ईटीसी केंद्रामार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे व अनेक कर्णबधीर मुलांना यामुळे ऐकू येऊ लागले आहे अशी माहिती देताना त्यांनी आत्तापर्यंतच्या सर्जरीमध्ये केवळ सात महिन्यांच्या अतिशय छोट्या बाळाची सर्जरी यशस्वी होण्याचा आनंद मोठा असल्याचे मत व्यक्त केले.

          या चिमुकल्याच्या सर्जरीबाबत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे व्यक्तिश: लक्ष देत सर्व घडामोडींचा वेळोवेळी आढावा घेत होते. या सर्जरी यशस्वी रितीने पार पडल्यानंतर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त करीत अशाच प्रकारे नवी मुंबईमधील जास्तीत जास्त दिव्यांगांना ईटीसी केंद्रामार्फत राबवण्यात येणा-या योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटिबध्द राहणेबाबत केंद्रास निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त़ श्री.सुनील पवार यांनीही अतिशय लहान वयात योग्य निदान झाल्यानंतर ईटीसीच्या योजनेअंतर्गत तत्परतेने योग्य मार्गदर्शन करून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता केलेल्या कार्यवाहीबद्दल ईटीसीतील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.

000000

संबंधित पोस्ट

विशेष लेख_ निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ एकाच छताखाली लाभ; शिबिराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार, सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी • नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

vishwatmaklokswamivarta