vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

नवी दिल्ली: प्रतिनिधी, देशाच्या राजधानीतील ‘महाराष्ट्र सदन‘ या भव्य वास्तूने आणि येथील उच्च दर्जाच्या शिष्टाचाराने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र सदनाला सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्राचे वैभव आणि येथील आदरातिथ्य पाहून हे आंतरराष्ट्रीय पाहुणे अक्षरशः भारावून गेले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या शिष्टमंडळाचे उत्साहात स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांनी सर्व परदेशी पाहुण्यांना राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून दिली.

या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलिया, युक्रेन, मॅसेडोनिया, मलेशिया, मालदीव, दक्षिण आफ्रिका, सर्बिया, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, फ्रान्स, दुबई, केनिया, मॉरिशस, इंडोनेशिया, मालदीव यांसारख्या विविध देशांतील 30 पाककला तज्ज्ञांनी महाराष्ट्र सदनाच्या वास्तूशिल्पाची पाहणी केली. निवासी आयुक्त आर. विमला यांनी या प्रतिनिधींना महाराष्ट्राची विविधता आणि जागतिक स्तरावर नावाजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती‘चे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे निवासी आयुक्तांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना ‘पारंपरिक दिवे‘ भेट म्हणून देऊन त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रकाशाचे प्रतीक मानले जाणारे हे दिवे स्वीकारताना पाहुण्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला.

या भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला. त्यांनी श्रीखंड, पुरणपोळी, झुणका-भाकरी आणि कढी-मसालाभात यांसारख्या पारंपरिक मराठी व्यंजनांचा आस्वाद घेतला. या चविष्ट मेजवानीने जागतिक स्तरावरील हे शेफ भारावून गेले. तसेच, विदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी गाण्यांचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय संगीताच्या तालावर हे सर्व मान्यवर मनसोक्त थिरकले.

निवासी आयुक्त आर. विमला आपल्या मनोगतात म्हणाल्या की, जगाच्या पाठीवरील विविध देशांतून आलेल्या कल्पक आणि प्रतिभावंत शेफचे यजमानपद भूषवणे, ही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा भेटींमुळे केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर दोन देशांमधील ऋणानुबंध अधिक दृढ होतात.

या शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्र सदनातील शिष्टाचार, स्वच्छता आणि इथल्या जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि सदनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

पुरीमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’चा परिणाम दिसू लागला आहे  जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे लाईफगार्ड आणि अग्निशमन विभागाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून आणि समुद्रात अंघोळ करण्यापासून रोखले आहे. सर्वांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

महास्ट्राईड अंतर्गत प्रोत्साहनात्मक निधीसाठी गुणवत्तापूर्ण कृती आराखडे तयार करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**कामगिरीआधारित निधी मिळविण्यावर भर; शासन निर्णयाचा अभ्यास करून नियोजन करण्याच्या सूचना*

ग्रंथोत्सवच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत⁠- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दोन दिवसीय ग्रंथोत्सव-2025 च्या सांगता कार्यक्रमात प्रतिपादन