शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरूप्रवेशासाठी २३ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अहिल्यानगर, क्रीडा प्रतिनिधी-राज्यातून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने, प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शिवछत्रपती क्रीडापीठ यांच्या अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२६-२७ या वर्षासाठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत ९ क्रीडा प्रबोधिनींमध्ये ‘सरळ प्रवेश’ (४० टक्के) व ‘कौशल्य चाचणी’ (६० टक्के) या निकषांवर आधारित निवासी व अनिवासी प्रकारचे प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी गुगल फॉर्मद्वारे २३ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली या ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनींची स्थापना झाली असून, या प्रबोधिनींमध्ये क्रीडा प्रशिक्षार्थींची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या प्रबोधिनींमध्ये ज्युडो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हँडबॉल, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, सायकलिंग आणि बॉक्सिंग अशा १५ क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
प्रवेश प्रक्रियेत ‘सरळ प्रवेश’ आणि ‘कौशल्य चाचणी’ असे दोन प्रकार आहेत. सरळ प्रवेश प्रक्रियेत संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले किंवा राज्याचे प्रतिनिधित्व केलेले १९ वर्षांखालील वयोगटातील खेळाडू तज्ज्ञ समितीसमोर घेतल्या जाणाऱ्या चाचणीद्वारे पात्र ठरविले जातात. या प्रकारात अर्जांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम ठरवून प्रवेश दिला जाईल.
कौशल्य चाचणी प्रकारात संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी झालेल्या १९ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंसाठी विशेष चाचणी आयोजित केली जाईल आणि त्यानुसार गुणवत्तेवर आधारित निवड करण्यात येईल. तसेच, खेलो इंडिया राज्य गुणवत्ता केंद्र (पुणे) अंतर्गत अॅथलेटिक्स, सायकलिंग आणि शूटिंग या क्रीडा प्रकारांसाठी २० वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंची निवड तज्ज्ञ समितीसमोर होणाऱ्या चाचणीद्वारे केली जाणार आहे.
राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागीय तसेच राज्यस्तरीय चाचण्यांसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची माहिती संकलित करण्यासाठी https://forms.gle/aqnpWXJKP2wsMVpdA ही गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र खेळाडूंनी २३ एप्रिल २०२६ पर्यंत या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीनंतर नोंदणी केलेल्या खेळाडूंची यादी संबंधित विभागीय उपसंचालकांकडे पाठवण्यात येईल. ज्या खेळाडूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, मात्र त्यांची नावे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहेत, त्यांची माहिती तत्काळ विभागीय स्तरावर पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नोंदणी न करता थेट चाचणीच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनाही संधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, कोणताही पात्र खेळाडू या संधीपासून वंचित राहू नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या निवड चाचण्या प्रथम विभागीय स्तरावर आणि त्यानंतर राज्यस्तरावर पार पडणार आहेत