
दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह यावे-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी रुग्णालयात येताना, ऑनलाईन अर्ज करुन, ईकेवायसी. करून आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करुन तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांसह आणि वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे उपलब्ध असतील तर त्यासह तपासणीकरिता यावे. जेणेकरुन त्यांचा वेळ वाचेल व प्रमाणपत्र तयार करण्यास विलंब होणार नाही. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी समंजसपणाने सुसंवाद साधून दिव्यांगाना मदत करीत असतात तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी केले.
दिव्यांग बांधवांना सुविधा मिळावी याकरिता जिल्हा रुग्णालय अलिबागमार्फत अधिनस्त उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालये येथे मोठ्ठया प्रमाणावर शिबिरे आयोजित करण्यात आली होती. तसेच सध्याही उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे प्रत्येक शुक्रवारी व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे प्रत्येक महिन्यातील पहिला गुरुवार आणि आवश्यकतेनुसार इतरही शिबीरे आयोजित करण्यात येत असतात.
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दिव्यांग व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था आहे. परंतु, गेल्या एक महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना यु.डी. आय.डी. प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही आरोग्य संस्थेत न जाता जिल्हा रुग्णालय अलिबाग येथेच दिव्यांग बांधव प्रमाणपत्रासाठी गर्दी करीत आहेत.
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र हे आठवडयातील दर बुधवारी दिले जात असून त्या दिवशी तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसोबत बऱ्याच वेळा 2 ते 4 लोक सोबत असतात. त्यामध्ये दिव्यांग सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्वेच्छेने येणारे सामाजिक कार्यकर्ते यांचाही समावेश असतो, त्यामुळे रुग्णालयातील उपस्थितांची संख्या आपोआप वाढते व काही वेळा ती संख्या 400 ते 500 पर्यंतही जाते. त्याचप्रमाणे, बुधवारी ओ.पी.डी. मध्ये इतर उपचारांकरिता येणाऱ्या रुग्णही असतात. त्यामुळे गर्दी वाढते व वाढलेल्या गर्दीमुळे बैठकीची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. तसेच बरेचसे रुग्ण सायंकाळी 4 वाजेनंतर येतात, त्यामुळे त्यांची तपासणी एका दिवसात पूर्ण होऊ शक्त नाही व त्यांना पुन्हा यावे लागते. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी कार्यान्वित असणारे UDID सॉफटवेअर हे संपूर्ण भारतामध्ये बुधवारी एकाच वेळी सुरु असल्यामुळे त्यावर लोड येऊन त्याची गती कमी होणे, साईट बंद पडणे अश्या तांत्रिक अडचणी येत असतात.
अनेक दिव्यांग व्यक्तींकडे मोबाईल नसतो किंवा असला तरी त्यांचा मोबाईल नंबर आधार नंबरशी लिंक नसतो, त्यामुळे ऑनलाईन अर्ज करता येत नाही व पर्यायाने प्रमाणपत्र तयार करता येत नाही. दिव्यांग व्यक्तीची तपासणी झाल्यानंतर त्याची माहिती UDID सॉफटवेअरमध्ये भरुन झाल्यानंतर प्रमाणपत्र बनविण्यासाठी 20 ते 30 मिनिटे लागतात.
पूर्वी दिव्यांग प्रमाणपत्र हे मॅन्युअली दिले जात असे व आता सन 2018 च्या शासन निर्णयानुसार UDID सॉफटवेअरमधून दिले जात असून नवीन प्रमाणपत्राचे दिव्यांगत्व टक्केवारीचे निकष वेगवेगळे असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्वाची टक्केवारी आजारानुसार कमी-जास्त होऊ शकते. दिव्यांगत्वाची टक्केवारी ही वयावर अवलंबून नसून ती आजारावर अवलंबून असते. त्यामुळे वय वाढल्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाण किंवा टक्केवारी वाढण्याचा प्रश्न येत नाही.
दिव्यांगत्व दाखला प्रक्रिया ही केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या नियम, अधिसूचना व मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडते. ही प्रक्रिया वैयक्तिक निर्णयावर आधारित नसून वैद्यकीय व प्रशासकीय समितीमार्फत तपासणी व अनुषंगिक कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पूर्ण केली जाते. कोणत्याही एका अधिकाऱ्याच्या वैयक्तिक निर्णयाने दाखला दिला जात नाही. “अपंगत्व दाखल प्रक्रियेत अनियमितता” या मथळयाखाली प्रसिद्ध आलेल्या लेखामध्ये काही अधिकारी व कार्यालयांबाबत अप्रत्यक्ष स्वरुपात उल्लेख करण्यांत आलेला आहे. सदर लेखामुळे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत समाजामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वरीलप्रमाणे नमूद वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
0000000



