vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवा अशा विविध बाबींचा**आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून सविस्तर आढावा*

*पावसाळ्यातील दक्षतेसह स्वच्छता, आरोग्य, शाळाप्रारंभ, ऑनलाईन सेवा अशा विविध बाबींचा**आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून सविस्तर आढावा*

नवी मुंबई प्रतिनिधी-अंतिम टप्प्यातील पावसाळी कामे युध्द पातळीवर पूर्ण करावीत तसेच रस्त्यांवर विविध कामांसाठी केलेले खड्डे बुजविल्यानंतर त्याचे पुनर्पृष्ठीकरण झाले असल्याची सर्व ठिकाणी खातरजमा करुन घ्यावी. स्ट्रॉम वॉटर ड्रेनच्या वॉटर एन्ट्री चोकअप होणार नाहीत याकडे नियमितपणे काटेकोरपणे लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. भरतीची वेळ आणि अतिवृष्टी जुळून आल्यास ज्याठिकाणी पाणी साचू शकते अशा सखल भागाकडे अधिक बारकाईने लक्ष्‍ा द्यावे व त्याठिकाणी जास्तीचे पाणी उपसा पंप व्यवस्था करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. होल्डींग पॉंड आणि पंपींग हाऊसच्या ठिकाणीही अतिरिक्त पंप व्यवस्था तसेच जनरेटर व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

नमुंमपा विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत पावसाळी कामे व इतर महत्वाच्या बाबींचा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

वृक्ष छाटणी केल्यानंतर पडणारा हरित कचरा लगेच उचलण्याबाबत यंत्रणा तत्पर ठेवावी तसेच सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष द्यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई महानगरपालिकेने दोन्ही परिमंडळासाठी स्थापन केलेले स्वतंत्र आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) मदत कार्यासाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने प्रमाण मानक कार्यप्रणाली तयार करावी व त्यांना कृतीशील करावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. अग्निशमन यंत्रणा कार्यतत्पर ठेवावी आणि उपलब्ध साहित्य, उपकरणे यांची चाचणी करून घ्यावी असे सूचित करतानाच महानगरपालिका क्षेत्रातील सिडको, रेल्वे, एमआयडीसी, पीड्ब्ल्यूडी, एमएसईडीसीएल अशा विविध प्राधिकरणांशी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.पाऊस पडत असताना सध्या 2-3 दिवसांचा खंड पडतो आहे. त्यामुळे असे ऊन व पावसाच्या कालावधीचे वातावरण डासांच्या उत्पत्तीला पोषक असून त्या अनुषंगाने डास प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर अधिक भर द्यावा. लोकवस्तीच्या भागात धुरीकरणाचे प्रमाण वाढवावे तसेच नागरिकांच्या दुलर्क्षामुळे एखाद्या घरात डास आळ्या निर्मिती झालेली आढळल्यास सामाजिक आरोग्याला विघातक बाबीबद्दल दंडात्मक कार्यवाही करण्याची खातरजमा करुन घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 150 दिवसांचा कार्यक्रम यामध्ये ई गव्हर्नन्स कृती आराखडा करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी व यामध्ये सर्वच विभागप्रमुखांनी लक्ष द्यावे अशा सूचना देत ऑनलाईन सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. या अंतर्गत व्हॉट्स ॲप आधारीत सेवा पुर्ततेकडे लक्ष देऊन एआय बेस्ड चॅटबोट, ब्लॉक चेन, डिजी लॉकर अशा अत्याधुनिक तंत्रप्रणालींचा कार्यालयीन वापर करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणा-या 68 लोकसेवा शासनाच्या आपले सरकार पोर्टलशी संलग्न असून या व्यतिरिक्त नागरिकांना पुरविण्यात येणा-या इतर 37 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याची सुरु असलेली कार्यवाही गतीने पूर्ण करुन घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.विभागामध्ये सुरु असलेल्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने डॅश बोर्ड हा उत्तम पर्याय असून त्यादृष्टीने मालमत्ता कर व घनकचरा व्यवस्थापन विभागांप्रमाणेच इतरही विभागांनी डॅश बोर्ड तयार करुन स्वत:ला अद्ययावत करावे अशा सूचना करण्यात आल्या.

16 जून पासून शाळा सुरु होत असून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात यावा असे निर्देशित करतांनाच विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात उत्साहाने स्वागत करावे तसेच त्यांना त्याच दिवशी युनिफॉर्म, पुस्तके उपलब्ध होतील याचे नियोजन करुन काटेकोर अंमलबजावणी करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.

मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार अनधिकृत बांधकामांची यादी विहित कालावधीत प्रसिध्द करण्यात यावी तसेच प्रतिज्ञापत्रात दर्शविलेल्या अनधिकृत बांधकामांची तपशीलवार यादी तयार करुन छायाचित्रांसह माहिती तयार करावी असेही आयुक्तांनी सूचित केले. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई नियमानुसार काटेकोरपणे करण्याचेही निर्देश आयुक्तांनी‍ दिले.

पावसाळी कालावधीच्या दृष्टीने धोकादायक इमारतींची यादी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांतून प्रसिध्दी देण्यात यावी तसेच सी-1 कॅटेगरीतील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. अतिक्रमण विभागाचे पोर्टल असावे व त्यामध्ये माहिती अदययावत ठेवण्यात यावी अशाही सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या.

: रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंगमुळे मोठया प्रमाणात वाहतुकीच्या समस्या होत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस विभागाच्या सहयोगाने नो पार्किंग झोनचे फलक लावावेत व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकडे लक्ष दयावे अशा सूचना देतानाच प्राधान्याने से-15 सीबीडी बेलापूर परिसरात नवी मुंबई महानगरपालिकेने बहुमजली वाहनतळ बांधला असून तो उपयोगात आणण्याच्या दृष्टीने तसेच या विभागातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने या बाबीच्या अंमलबजावणीकडे गांभिर्याने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

नवी मुंबई महानगरपालिकेने यावर्षी 1.25 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दीष्ट ठेवले असून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनी विविध विभागांमध्ये लोकसहभागातून त्याची मोठया प्रमाणावर सुरुवात झालेली आहे. यामधील बहुतांशी वृक्षारोपण हे पावसाळयाच्या सुरुवातीच्या कालावधीतच करुन घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.

नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर अथवा पाणीपट्टी भरण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिल्या असून नागरिक महानगरपालिकेची वेबसाइट www.nmmc.gov.in तसेच My NMMC ॲप यावरुन आपली देयक रक्कम भरु शकतात. याशिवाय क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व युपीआय सुविधांव्दारेही करभरणा सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांपर्यंत या ऑनलाईन सुविधांची माहिती जास्तीत जास्त प्रमाणात पोहचवावी, यामध्ये सोशल मिडीयासह डिजीटल होर्डिंग्ज तसेच घंटागाडी, एनएमएमटी बसेस व सिग्नलवरील उद्घोषणा यांचाही प्रभावी वापर करावा, जेणेकरुन नागरिक घरबसल्या रक्कम अदा करु शकतील व त्यांना महापालिका कार्यालयात त्यासाठी येऊन श्रम, रक्कम व वेळ खर्च करण्याची गरज भासणार नाही असेही निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करुन देणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी तत्पर रहावे व त्यासोबतच महानगरपालिकेच्या मालमत्तांचा गैरवापर केला जाणार नाही याबाबतही दक्ष रहावे अशा सूचना नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केल्या.

संबंधित पोस्ट

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्तमहिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने व्याख्यानांतून गुरु-शिष्य परंपरेविषयी प्रबोधन-मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा लाभ घ्या- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम- अभियानात दिनांक 20 सप्टेंबरअखेर 3 हजार 148 रूग्णांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta