गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरेला डिजिटल व्यासपीठ‘Bappa.org’ डिजिटल उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हा परिषद ठाणेचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, लोकसहभाग, सजावट, सामाजिक उपक्रम तसेच बाप्पाशी संबंधित आठवणी डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी नागरिकांनी ‘Bappa.org’ या डिजिटल उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून गणेशोत्सवाशी संबंधित विविध पैलू डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, पारंपरिक पद्धती, सामाजिक उपक्रम आणि बाप्पाशी निगडित आठवणी डिजिटल स्वरूपात नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या डिजिटल व्यासपीठावर नोंदणी करून आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित एक छायाचित्र तसेच त्यामागील कथा, परंपरा किंवा आठवण नोंदवावी. यशस्वी नोंदणीनंतर सहभागी नागरिकांना अधिकृत सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे राज्यातील विविध भागांतील गणेशोत्सवाच्या परंपरा, लोककला, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वारसा यांचे डिजिटल दस्तऐवजीकरण होण्यास मदत होणार आहे.
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली समृद्ध परंपरा आहे. प्रत्येक कुटुंब, गाव आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या काही ना काही आगळ्या आठवणी आणि परंपरा आहेत. या आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची संधी डिजिटल माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाची छायाचित्रे, कथा, परंपरा आणि आठवणी डिजिटल स्वरूपात नोंदवाव्यात.” – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव
“गणेशोत्सवाशी संबंधित नागरिकांचा सहभाग आणि स्थानिक पातळीवरील परंपरा डिजिटल माध्यमातून नोंदविणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना या उपक्रमाची माहिती देऊन जास्तीत जास्त सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण सजावट, सामाजिक संदेश देणारे उपक्रम, पारंपरिक पद्धती आणि बाप्पाशी संबंधित आठवणी नागरिकांनी डिजिटल व्यासपीठावर नोंदवाव्यात.” – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरेचा डिजिटल ठेवा निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने करण्यात आले आहे.